२६ तारखेला काही इ-मित्रमंडळी 'याची देही याची डोळा' भेटली त्या निमित्ताने . .
कोण कुठले दहा बाराजण भेटण्याचा उत्साह दर्शवतात.
कोणाला ही कल्पना सहज शक्य वाटते, कुणी दुविधेत पडतात.
दुविधा अशी की जशी मी भेटण्याची तयारी दाखवली, तशी इतर सगळे दाखवतील की नाही?
दाखवलीच तर तो माणूस नक्की ती पूर्ण करेल कि नाही!
साहजिक आहे - एखादा माणूस 'जेन्युईन' झाला की तो समोरच्या व्यक्तीकडून तशीच अपेक्षा करू लागतो.
तरी काहींनी हट्ट सोडला नाही. नेट-भेट ची वाटचाल थेट-भेट च्या दिशेने अंगात आल्यासारखी सुरु केली. अश्या उत्साहाने कि भेट, ग्रेट-भेट झाली नाही तरी पर्वा नव्हती. या दांडग्या उत्साहामुळेच अखेरच्या क्षणी दोन-तीन टाळकी वाढली सुद्धा!
तशी सुरुवातीला निमंत्रण दिलेल्यांचा आकडा मोठ्ठा होता, पण का होईना त्याच्या ६० टक्के बझकर तयार झाली.
माहिती नाही जगात अशी किती लोकं पूर्वी भेटली असतील.
एक - दोन ठीके हो पण एकदम बारा?
एकदम बारा लोकांची भेट यशस्वी होण्याचे चान्सेस जेवढे होते, तेवढेच मोठ्ठा पोपट होण्याचे सुद्धा होते.
पण सगळेच जण बेधडक होते.
एकमेकाना साद घालणे सुरु झाले आणि श्रीगणेशा चरणीच भेट ठरली.
पुणे निघाले . . . . चला जेवढे येणार होते ते आले - नाही म्हणायला तसा एक जास्तच आला.
आता ओढ लागली ती कधीही न पाहिलेल्या, पण तरीही ज्यांना 'चांगलं ओळखतो' अश्या सवंगड्याना भेटायला.
रस्त्यावरच्या रंगवलेल्या पट्ट्यांना मागे टाकता टाकता बझ अन ब्लॉग वर पुर्वी घालवलेल्या आठवणींचे धागे विणता विणता मुंबापुरीस लवकरच पोचलो.
उत्सुकता पराकोटीस होती, ओम शांती ओम च्या गाण्यात नट नट्या एकेक करून एन्ट्री मारतात तसे प्रत्येक जण येत होते.
सगळे जमता जमता तास उलटला.
खरतर सुरुवातीला थोडंसं मळभ होतं, सगळेच थोडा विचार करत थोडा सहभाग घेत होते पण ही 'व्हर्चुअल' नाती अस्मानीच्या निळाईसारखी एकरंग व्हायला फार वेळ नाही लागला.
गेल्या दोन्-तीन महिन्यातले बझ वर घातलेले गोंधळ शब्दात येउ लागले, तशी अचानक भेटेचे रुपांतर मैफीलीत होउ लागले.
एके ठिकाणी "अरे! ही बझ वर जखमी सिंहिणीसारखी असते, प्रत्यक्षात कसली शेळी आहे!" तर दुसरीकडे "मला वाटलं हा शांत असेल पण कसला बोलतोय!" अशी वाक्ये कानावर पडू लागली.
संवेदनशील आणि भावनिक असे लिखाण करणारे एकदम खूप रांगडे आणि स्वच्छंदी वाटले. अपेक्षेप्रमाणे काही व्यक्ती अनुभवल्या ज्या त्यांच्या लिखाणाप्रमाणेच सौम्य, शांत आणि परिपक्व होत्या.
काही चटपटीत, काही कलंदर, काही लपलेले, काही बागडणारे, काही पुढारी - सगळ्या व्यक्ती आणि वल्ली जस-जश्या खुलल्या तसतशी भट्टी चांगलीच जमली.
चौपाटीच्या किंवा कुठल्या बागेच्या भेळेचा एक गुणधर्म असतो.
आंबट, तुरट, गोड, तिखट, खारट आणि अनेक कितीतरी चवी भेळेमध्ये फक्त 'असून' उपयोग नसतो.
त्यांचे प्रमाण बरोब्बर असेल तरच भेळेला चट्पटीतपणा येतो आणि त्यामुळे मजा येते. त्यादिवशी तसंच झालं, भेळ इतकी चविष्ट जमली की जरा जास्तच मनसोक्तपणे खाल्ली.
दिवसभर सागराच्या अवतीभवती राहून त्याच्याएवढ्याच खोल पण मैत्रीच्या गहराइमध्ये अगदी दमेपर्यंत डुंबलो. पश्चिमेच्या कागदाला केशरी रंग दिसू लागला तसं मन भानावर आणून सगळीच पाखरे घरी परतण्यासाठी आपापली दिशा शोधू लागली.
काय गम्मत आहे पहा ना - आता चार दिवसांनी वाटतंय की, पुन्हा भेटू सगळे जण कधीतरी, पण त्याचवेळेस मनातली पाल पुन्हा चुकचुकती आहे,
"आता भरून गेली, तशी पाखरांची शाळा पुन्हा परत भरेल का?"
Comments
Nice One..
paratichya ya vatevarti asech ka he ghadate?????
dostannoo. tyabaddal kuni kahihi mhano . . mhanoon pahilyanda tumhalaa dhans!
Amar - Yenaar nakkee yenaar
Ranangan - Khoop thanks! sorry jar radawle asel tar.
Vaishali - punha swatahachech june kosh khulawat astaat mhanoon ase ghadate
Nivy - Nusti date naka tharwoo ata 'date' laa ghewoon yaa! :)
:)