Skip to main content

भीमसेन - एक साठवण

प्रसंग पहिला
स्थळ - आहिल्यादेवी शाळेचा चौक - शनिवार पेठ, पुणे
साधारण काळ - १९५५ - ५८
एक मोठा चौक. तसा चौक म्हणजे नावाला. चार दिशेने चार रस्ते कसे बसे एका ठिकाणी आले होते म्हणून तो काय चौक. चौकातच मोठी मोठी वडाची झाडं. एक चार पाच वर्षांचा, लहानगा अर्धी चड्डी घातलेला मुलगा चौकातच गाण्याच्या कार्यक्रमासाठी घातलेल्या मोठ्या मांडवात बागडत होता. एकटाच होता खूषीत. त्याच चौकात तर त्याचं घर होतं. आज पंडीत भीमसेन जोशींचे शास्त्रीय संगीत होते ना. थोड्यावेळाने एक उंचपुरा, काळी टोपी घातलेला गायक रंगमंच्यावर येउन बसला. "हा भीमसेन हळूहळू फार गुणी गायक बनतोय. सवाईगंधर्वांचा शिष्य आहे तो! " - कुणीतरी कुजबुजलं. यथावकाश कार्यक्रम सुरु झाला. भीमसेन चा बुलंद आवाज ऐकून रसिक मंत्रमुग्ध व्हायला लागले. बराच वेळ खेळत असलेला लहानगा, भीमसेनजींचा द्रुत सुरु झाल्यावर त्यांच्या आक्रमक हावभावाला, वेगाने जाणार्‍या एखाद्या तानेसोबत एकदम पुढे वाकण्याच्या त्यांच्या सवयीला, गाण्याची छेडखानी करताना त्यांच्या चेहर्‍यावर उमट्लेल्या रेषांकडे पाहून गाल्यातल्या गालात हसत होता. त्याचीच तर त्याला मजा वाटत होती. त्याला कुठे काही गाणे समजत होते? कर्यक्रम संपला तेव्हा लोक म्हणाले, "मजा आला असं गाणं ऐकून!".

प्रसंग दुसरा
स्थळ - जुनी मंडई, बुधवार पेठ, पुणे
साधारण काळ - १९७० - ७२
रात्रीची वेळ. ८ वाजलेले. रस्त्यातच मध्यवर्ती ठिकाणी एक स्टेज बांधलेला. अखिल मंडई मंडळाचा सांस्क्रुतिक कार्यक्रम होता. साहजीकच श्रोत्यांमध्ये मंडईमधले व्यापारी, हमाल, कामगार वर्ग, पुण्याच्या मध्यवर्ती भागात आयोजीत केल्यामुळे आजूबाजूचा रहिवासी परीसर असा खर्‍याअर्थाने बहुजन समाज रस्त्यावर एकवट्लेला होता. रस्त्यावरच सर्वजण बसले होते. आता भीमसेनजींची वाट पाहत होते. कार्यक्रमाची वेळ केव्हाच उलटून गेली होती. मंडई मंडळाचे कार्यकर्ते मघाशीच लगबगीने जाताना दिसले होते. रात्रीचे साडे अकरा वाजले. शेवटी भीमसेन दिसले, त्यांना त्यांचा तोल नीट सावरता येत नव्हता. दोघांनी त्यांना धरले होते. मंचापर्यंत कसे तरी पोहोचवले आणि बैठक मांडली. पंधरा मिनिटातच त्यांनी पहिला अभंग छेडला - "कान्होबा तुझी घोंगडी चांगली." सगळेच उपस्थित शहारले. हळूहळू भक्तिरसात सगळे डोलू लागले. कार्यक्रम पहाटे साडेतीन ला संपला. पंडीतजींची प्रक्रुती नीट नव्हती असं उगाच वाटलं बहुतेक - एक २० - २२ वर्षांचा तरूण मनातल्या मनात म्हणाला.

प्रसंग तीसरा
स्थळ - सारसबाग ते स्वारगेट हा रस्ता, पुणे
साधारण काळ - बहुदा १९८० आसपासचा
पंडीतजीचा नावलौकीक खूपच वाढला होता. जगभरात त्यांचा श्रोत्रुवर्ग तयार झाला होता. सारबागे समोर महलक्ष्मीच्या मंदीराच्या उद्घाटन प्रसंगी पंडीतजींना निमंत्रित केले होते. प्रचंड जनसमुदाय उसळला. संयोजकांसमोर मोठी अड्चण उभी राहिली. स्वारगेट्चा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागणार. वेळीच शक्कल लढवून, संयोजकांनी गर्दीला नेहरू स्टेडियम मध्ये जायची घोषणा केली. पुर्ण मैदानात श्रोते आणि पॅव्हेलियनच्या मुख्य दर्शनी भागात भीमसेन, असा कार्यक्रम सुरु झाला - तिथे एक मध्यवयीन ग्रुहस्थ होता - त्यांने आयुष्यात पहिल्यांदा 'राम रंगी रंगले' हे भजन पहिल्यांदा त्याच वेळेस ऐकले. पुढे एकसेएक अभंग रंगले. लोकांना इतक्या वर्षात आता या कलाकाराची किंबहुना त्या कलेची जबरदस्त ओढ लागली होती.

प्रसंग चवथा
स्थळ - रमणबाग हायस्कूल, नारायण पेठ, पुणे
काळ - आठ- दहा वर्षांपूर्वीचा
कार्यक्रम सुरु होउन तासभर झाला असेल. पंडीतजींचे गाणे एव्हाना खुलले होते. तंबोर्‍यावर साथीला एक ज्येष्ट गायक होते. पंडीतजींच्या पेक्षा वीसेक वर्षांनीच लहान असतील. पंडीतजी ऐशीच्या घरातले होते तरी त्यांचा बुलंद आवाज स्टेजसमोर अगदी जवळ खाली बसलेल्या एका माणसाला खिळ्वून ठेवण्यास पुरुन उरेल असा होता. गात असलेल्या बंदिशीत, पंडीतजी पुन्हा मुखड्यावर आले आणि त्यानी एक हरकत घेतली. साथीच्या गायकाने तिच हरकत जरा घाबरत घाबरत घेतली. तशी सुरातच घेतली, पण अगदीच मुळ्मुळीत ऐकू आली. पंडीतजीनी पुन्हा तीच हरकत ताकदीनिशी घेतली, आणि हातवार्‍याने सुचवलं "असं गा!" त्याने पुन्हा प्रयत्न केला चढा आवाज येइना. नंतर तो इतका घाबरला की तीच हरकत घेण्याचा पुन्हा प्रयत्न भर महोत्सवात अर्धवट सोडला. भीमसेनचा आवाज माझ्या आत का पोहोचतो आणि इतरांचे का नाही, हे त्या पांढरट केस झालेल्या आणि आयुष्यात बर्‍याचदा भीमसेन ऐकलेल्या मनुष्यास त्या वेळी पहिल्यांदा समजले.

वरच्या सगळ्या प्रसंगात जो बालक, तरुण, मध्यवयीन ग्रुहस्थ आहे तो मला सोमवारी भेटला. हे प्रसंग त्यानेच सांगितले होते अधीमधी.
त्यांचही वय झालय आता. साठीत आहेत ते, पण द्र्ष्टी कमजोर झाली आहे आणि ऐकू यायचे प्रमाणही. ते म्हणाले, "आज भीमसेन जोशी गेल्याचे कळले, लोक म्हणतील 'सुटले' म्हणून. खूप आजारी होते ना, पण नाही. मला वाटलं की भारतीय संस्क्रुतीचा मानबिंदू हरपला. झालं ते वाईट झालं. खूप विचार केला आज. मी पुल देशपांडे, ग.दि. माडगूळ्कर, कुमार गंधर्व, सुधीर फडके असल्या दिग्गजांच्या उमेदीच्या काळात मी वाढलो आणि माझं आयुष्य घालवलं, भीमसेनजींचे तर किती गाणे ऐकलं - स्वतःला किती नशीबवान समजू!"

मी आधीच व्यथीत होतो म्हणालो - " त्यांच्या म्रुत्युमुळे संस्क्रुती संपली, आता पुढे काय कुणास ठाउक!".

तो ग्रुहस्थ मला म्हणाला, 'संस्क्रुती संपायला तो काही सर्वसाधारण माणूस नाहिये. तो माणूस शरीररुपी गेला पण स्वररुपी अमर आहे. त्यांचा आवाज सतत अजून कुणाला तरी कायम बळ देतच राहील. तो स्वरभास्कर आहे, भास्कर उगवण्यासाठीच मावळत असतो."

खूप रिकाम्या पोकळीने मी तिथून काढता पाय घेतला.

Comments

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

सीबिस्किट

ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही. भाग एक - हॊवर्ड कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your ...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...