ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही.
भाग एक - हॊवर्ड
कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा. घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your life, just because its banged up a little." हॊवर्डचे डोळे उघडतात. तो स्मिथला त्याचा तबेल्याचा व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून ठेवतो.
कुणाचं न ऐकणारा पिसाळलेला असा सीबिस्किट अश्व अखेरीस पोलार्डपुढे नमते घेतो. स्मिथची विचित्र प्रशिक्षण पद्धती तसेच रेड पोलार्ड (जॊकी) अन तो यांच्यात असलेला समन्व्यय यांमुळे सीबिस्किट हळूहळू एक छोट्या चणीचा पण विशाल ह्रदय असलेला आणि तसेच शर्यती जिंकणारा दर्जेदार अश्व म्हणून स्थान पक्के करू लागतो. हा बदल पाहून प्रत्येक प्रेक्षकाला यावेळेस स्मिथने हॊवर्ड ला सांगितलेलं तेच वाक्य पुन्हा आठवतं आणि पटतं, "You dont throw away your life, just because its banged up a little."
भाग तीन - रेड पोलार्ड
हळूहळू सीबिस्किट आणि जॊकी रेड पोलार्ड एकापाठोपाठ खूप शर्यती जिंकल्याने लोकप्रिय होत जातात. एका मुख्य डर्बी मध्ये त्यांची ’अडमिरल वॊर’ नावाच्या एका अश्वाशी गाठ असते. सिबिस्किट आणि रेड पोलार्ड या दोघांचीही ही खरी कसोटीच असते. ’अडमिरल वॊर’ हा एक मजबूत सलग १६ डर्बीज जिंकणारा तसेच ट्रिपल क्राउन विनर असा अश्व असतो.
शर्यत सुरु होते. शर्यतीत सगळं रेड नी ठरवल्याप्रमाणे होत असतं. रेस संपताना आपण खूप पुढे आहोत आणि सहज शर्यत जिंकू असे समजणारा रेड अखेरच्या क्षणी गाफ़ील राहिल्याने फ़ोटो फ़िनिश मध्ये हरतो. रेस नंतरच हॊवर्ड आणि स्मिथ या दोघांनाही कळते की रेड पोलार्ड एक डोळ्यांनी अंध आहे. अश्या एवढ्या फ़सवणुकीनंतरही हॊवर्ड रेड पोलार्डला नोकरीवरून काढून टाकत नाही. वर तो असे जाहीर करतो की सीबिस्किट आणि पोलार्ड हे पुन्हा अडमिरल वॊरशी खेळतील. त्यावेळी सर्रकन स्मिथचे तेच वाक्य पुन्हा आठवते, "You dont throw away your life, just because its banged up a little."
भाग ४ - सीबिस्किट आणि रेड पोलार्ड
पोलार्ड जोर्ज वूल्फ़ला सीबिस्किट्ची सगळी रहस्य सांगतो शिवाय तो म्हणतो, "शेवटच्या वळणावर सीबिस्किट जर पुढे असेल तरीही त्याला थोडं हळू कर, त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे त्याला नीट पाहूंदेत. ही नजर सीबिस्किटला एका वेगळ्या गिअर मध्ये घेवून जाईल. Its not in his feet, its in in his heart." शर्यतीत सीबिस्किट यावेळी अडमिरल वॊरला सोडत नाही, त्याचा दणदणीत विजय होतो. रेड पोलार्ड इस्पितळात या शर्यतीचे समलोचन ऐकत असतो, त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो.
दुर्दैवानी नंतर लगेचच एका शर्यतीत वूल्फ़-सीबिस्किट अशी जोडी असताना सीबिस्किटचा पाय दुखावतो. तेव्हा स्पष्ट होतं की सीबिस्किट पुन्हा शर्यतीत धावू शकणार नाही. त्या अश्वाचा आता काहीच उपयोग राहिलेला नसतो, तरी हॊवर्ड सिबिस्किट्ला गोळी घालून ठार न मारता, उपचार घेत असणारा त्याचा जॊकी रेड पोलार्डकडे पाठवून देतो. रेड पोलार्ड आणि सीबिस्किट दोघेही लंगडत लंगडत एकमेकांची साथ देत असतात. मोकळ्या हवेत हिंडून, औषधोपचार करून, व्यायाम करून सीबिस्किटचे लंगडणे हळूहळू कमी होउ लागले असते. अचानक सर्वांनाच खात्री वाटू लागते की कदाचित सीबिस्किट पुन्हा शर्यतीत पळू शकेल.
कालांतराने सीबिस्किट बराच तंदूरुस्त होतो. त्याचा जॊकी म्हणून रेड पोलार्ड हॊवर्डकडे खूप आग्रह करतो. पण रेड वरच्या प्रेमापोटी हॊवर्ड वूल्फ़लाच बोलावतो. रेडची इच्छाशक्ती खूप बळावली असते पण दरम्यान खूप प्रयत्नांती रेड पोलार्ड आणि सीबिस्किट यांचीच जोडी शर्यतीत उतरते. यावेळेस धोका एवढाच असतो की सीबिस्किटची सगळी रहस्ये वूल्फ़ला चांगलीच ठावूक असतात. शर्यती दरम्यान सीबिस्किट नेहमीप्रमाणे त्याचा वेग कमी करतो, वूल्फ़ला हे माहीत असल्याने तो मुद्दाम मागेच राहतो, एवढे करूनही अखेरीस विजय सीबिस्किट आणि रेडचाच होतो. सिनेमा संपताना रेडचं एक वाक्य आहे, "You know everybody thinks we found this broken down horse and fixed him; but we didn't, he fixed us, everyone of us . . . and I guess we kind of fixed each other too."
चित्रपटातील घटनांचे सहज सादरीकरण, प्रसंगांचे चित्रण यातून भावनांच्या मोठ्या लाटा तयार होउन धाडकन छातीवर आदळत राहतात. सर्वच पात्रांचा अभिनय सुंदर आहे. सिनेमातील एकही सीन उगीच आहे असे कधीच वाटत नाही. चित्रपटातील घोड्यांचे चित्रण ही तर एक झंझावाती कविताच! १९३० च्या आसपासचा काळ, त्यावेळच्या छोट्या छोट्या गोष्टी सुरेख. नेत्रसुखद म्हणजे चित्रीकरण. निसर्गचित्रण हे तर चित्रपट सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत एकदम चाबूक. घोड्यांच्या शर्यतीचे इतकं थरारक अन वास्तववादी चित्रण मी पहिल्यांदाच पाहिलं असेल. गलितगात्र न होता, जे काही आहे ते वापरून घ्या अन यशस्वी व्हा असा संदेश सिनेमा सतत बघताना मिळत राहतो..
ही एक सत्यघटना आहे. आज सीबिस्किट्चा पुतळा सॆंटा अनिता पार्क, अर्केडिया, कॆलिफ़ोर्निया येथे त्याची आठवण म्हणून आहे. असा हा प्रेरणा देणारा सिनेमा. यामुळेच की काय बहुदा जास्त शब्द न सुचता, अख्खी कथाच इथे लिहिली गेली असेल. :) पण तसे कच्चे दुवे वगैरे नाहीचेत मुळी. मनाच्या कप्प्यात साठवून ठेवावा असा हा चित्रपट. कदाचित पाहिलाही असेल तुम्ही, पण नसेल पाहिलात तर नक्की पहा.
Comments