Skip to main content

स्थितप्रज्ञ प्राणीमित्र

Apologies for my non-marathi followers!

अमेरिकेमधली सुप्रसिद्ध (का कुप्रसिद्ध?) सोशलाइट (गावभर हिंडणारी भोचक भवानी) प्यारीस हिल्टन हिचं तिच्या ख्याती प्रमाणेच वाक्य आहे, ती म्हणते, " प्रत्येक स्त्री जवळ तीन पाळीव प्राणी असणे अत्यावश्यक आहेत.  पार्किंग मध्ये जग्वार, बेडरूम मध्ये वाघ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्या जीवावर कितीही पैसा खर्च करू शकू असा एक महागाढव! (कशी काय सुचतात अशी वाक्ये तीच जाणे!)


आपल्या देशी रस्त्यांवर आपण बरेचदा असे विविध प्रकारचे भटके आणि विमुक्त (क्वचित प्रसंगी पाळीव) प्राणीमित्र पाहतो.खूप वेळा मला असा प्रश्न पडतो की यांच्या डोक्यात नक्की काय चालले असेल? मध्ये एकदा एक गाढव पहिला. असाच कुठे तरी रस्त्याच्या मध्यभागी एखाद्या तपश्चर्येला उभे राहिले असल्या सारखा; किंबहुना कुणीतरी त्याला तश्याप्रकारे उभे राहायला सांगितल्याप्रमाणे ते निश्चल उभे होते...अगदी श्रीकृष्णाने अर्जुनला जी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत ना, तशीच 'ना सुख ना दु:ख, ना सोयर ना सुतक' च्या यौगिक पोज मध्ये उभे होते. त्या प्राणाच्या डोक्यात त्या पोज मध्ये असताना काय विचार चालू आहे हे जर मला कुणी पुराव्यानिशी  सिद्ध करून दाखवलं ना तर मी त्याचा जाहीर सत्कार करीन हे मी वचन देतो. अरे किती मख्ख असावे एखाद्यानी! मख्खपणाचा कहर झाला म्हणजे. बहुदा अश्या अवस्थेत ते मेंदू बंद करीत असावे.


अजून एक असंच उदाहरण द्यायचं झालं तर आपला शहरातला हत्ती. आपले हे गजराज कुठे तरी पाने खात फांद्या उडवत डुलत डुलत चालले असतात . . अचानक त्याच गल्लीतल्या एका 'मवाली' कुत्र्याच्या टोळीला काय चीड येते समजत नाही, बहुदा त्यांना insecure वाटत असावे एवढं मोठा प्राणी पाहून. ही टोळी जी काय कान किटे पर्यंत हत्तीकडे पाहत भुंकायला लागते ना हे न सांगणे. मनुष्यप्राणी त्या सामुहिक भुंकण्याला एवढं वैतागतो तर खुद्द एवढे मोठे कान असलेला तो हत्ती इतक्या गोंगाटात मन:शांती कशी काय पाळू शकतो हा ही प्रश्न मला असे दृश्य पाहिल्यावर हमखास पडतो. ती कुत्रीच शेवटी घसा आटवून आटवून दमून जातात आणि थांबतात. तो पर्यंत तो हत्ती दूर गेला असतो. तेंवा अधून मधून उसने भुंकणे आणल्यासारखे एक सेकंदभर छोटेसे भुंकून निषेध, धमकी आणि आश्चर्य व्यक्त करीत असावीत. मोठं भांडण संपल्यावर शीतयुद्धा सारखं  काही माणसं एकटेच स्वत:शीच तावातावानी बोलतात ना - '...अरे मला सांगतोय', 'काय समजतो कोण स्वत:ला', 'अरे गेलं खड्डयात'  वगैरे तश्या प्रकारचं ते कुत्र्यांचं, हत्ती दूर गेल्यावरच एक छोटा 'भू:' असेल. आणि कुत्र्यांचा हा फट्टूपणा पहा ना,  हा छोटा भू: 'मी किती भारी हत्तीला हुसकावला' या आवेशात करणार, हत्ती जवळ असेल तर मात्र घाबरत घाबरत भुंकत राहणार. पण या अश्या दुर्लक्ष करण्याच्या हत्तीच्या सवयीमुळे मला कायमच तो पापभीरू वाटत आलं आहे. बाकी त्या माहुताचे कौतुक कराव तेवढं कमीच आहे. हत्ती पाळणे आणि अश्या परिस्थिती मध्ये सुद्धा तो चालवणे ही काही सोप्पी गोष्ट नाहीये.          


पाळीव उंट हा प्राणी मात्र मला बिचारा वाटतो. एक तर त्याचा चेहरा इतका बावळट असतो की विचारू नका, त्यातून त्याची सतत रवंथ करण्याची सवय. त्याची ती वेडी वाकडी तोंडं पाहून तो त्यांच्या धन्याप्रमाणेच राजस्थानी मवाळ भाषा बोलत असेल असं वाटतं. लहानपणी एकदा एक मोठ्ठा उंट मी नवीन स्कूटी शिकलेली असताना अकारण मागे लागला तेव्हापासून मी उंटापासून चार हात (किंवा चार चाक) दूरच असतो. अचानक पाउस पडायला लागल्यावर सिग्नल ला उभा असलेला उंट बिथरला आणि त्याच्या पुढे गाडीवर उभे राहिलेल्या माणसाच्या मागे लागला - तो माणूसही घाबरून एम एस ई बी च्या ऑफिस मध्ये गाडी घेउन गेला - आणि उंटही त्याच्या मागे येत त्याची मान पैसे भरायच्या खिडकीत कशी अडकवून बसला हा एक महान किस्सा अजूनही मला उंट दिसला की आठवतोच. त्यामुळे त्या प्राण्याबद्दल मला खात्री इल्ले!  (इकडे अंगठा वर आणि डावी - उजवीकडे)


असाच एक स्वत:च्या विश्वात असणारा प्राणी म्हणजे मांजर. माझ्या आज्जीने तिच्या उभ्या आयुष्यात मांजराचा उल्लेख 'मांजरडे' या शिवाय वेगळा केला नाही. दुधा तुपाला महत्व असलेल्या त्या काळात या प्राण्याला माननीय संबोधन कुणी करेल ही अपेक्षाच चुकीची आहे नाही का! 'कुरवाळलं तर ठीके पण उगाच अपेक्षा करणार नाही ' हे  मात्र ते दाखवून देईल. जेव्हा इच्छा असेल तेव्हा मात्र लाड करून घेईल. कधी कधी मांजरांना लाड अजीर्ण ही होतात आणि ते लाड जास्त झाले, तर मग मात्र रामपुरी चाकू सारखी मांजराची नखे कधी तुमच्या त्वचेवर सापक्कन ओरखडा आणतील याची शाश्वती नाही. त्या प्राण्याचे हे वागणे इतके स्वतंत्र असते ना की त्याला विचारावेसे वाटते की 'तुझ्या आयुष्यात माझी काही किंमत आहे का नाही?' कपाटावर चढून बसलेले किंवा घराजवळच्या दुसऱ्या एखाद्या बंगल्याच्या गच्चीत उंच ठिकाणावर बसलेले मांजर हे जणू काही स्वतःचे राज्य पाहत असलेल्या राजासारखे तोरा दाखवते. कधीतरी चुकून ओट्याजवळची खिडकी उघडी राहिली की मांजराच्या पंज्याचे ठसे पाहून, मांजर भरतनाट्यम चा सराव करत होती काय हा प्रश्न पडतो. टीव्हीच्या उबेत त्याला टेकून मुटकुळी करून आळसावलेले मांजर, जेव्हा तुम्ही आनंदानी म्हणता 'उद्या मला बोनस मिळणार' तर बरोब्बर त्या वेळेस मोठी जांभई देतं. तेव्हा वाटतं की 'कुणाचा काय तर कुणाचं काय' हा विचार ते करत असेल. ते ही असंच 'लोड नही लेनेका मामू!' या वर्गातला वाटतं. त्याचा एकंदरीत तणावमुक्त स्वभाव बघता एवढं मात्र नक्की आहे की त्या प्राण्याला कधीही ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा त्रास होणार नाही. त्रास ते करून घेतंच नाही कधी.


मित्राच्याकडे २ मांजरी होत्या . . ६ महिने एकत्र वाढल्या . . अचानक एकमेकांशी खेळत असता रस्ता ओलांडण्याच्या नादात एक मांजर गाडी खाली आली. दुसऱ्या मांजरांनी तिचे मृत शरीर पाहिले आणि नंतरचे ३ दिवस अस्वस्थ बसून बैचेनीत काढले. त्यानंतर मी मांजरांवर 'हा प्राणी आपमतलबी असतो' असा आरोप कधीच केला नाही.      



Comments

JaJJo said…
Chhan jamlela ahe !! :)
Unknown said…
Dhanyawad!

:-D
Vanty said…
chhan lihila ahe maja ali vachatana
Unknown said…
wa re ,mast writup !
Unknown said…
Tari Dukkar, kombdi, ani gaayee rahilya! :-)

Awroon ghetla . . pay pasarle nahit jasta!
Anonymous said…
wa re arjya... full tp jala...

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

सीबिस्किट

ही एक उत्क्रुष्ट कलाक्रुती पाहण्याचा योग आला. चित्रपटाचे पुढील चार भागात तुकडे पाडले आहेत. सिनेमाच्या पुस्तकातले हे चार वेगवेगळे धडे आहेत असं म्हंटलं तरी काही हरकत नाही. भाग एक - हॊवर्ड कारच्या खरेदी-विक्रीचा याचा व्यवसाय. अपघातात तो आधी त्याचा मुलगा आणि नंतर त्याच्या पत्नीला गमावतो. तसा यशस्वी पण सर्वस्व गमावल्याने खचलेला, कशात काही मन लागत नाही असा.  घोड्यांची पैदास करून शर्यतीचे घोडे वाढवण्याची त्याची इच्छा असते. त्याच्या या धंद्या निमित्ताने  फ़िरत असतानाच त्याला एक स्त्री भेटते आणि दोघांचे लग्नही होते. पुढे एके दिवशी घोड्यांच्या तबेल्यात त्याला स्मिथ नावाचा म्हातारा भेटतो. तो म्हातारा एका घोड्याबरोबर माळरानावर राहत असतो. त्याचा सध्याचा घोडा पुर्वी जायबंदी झालेला असतो त्यामुळे त्याला त्याचा मालक गोळी घालत असताना या म्हातार्या स्मिथनी  वाचवलेला असतो. स्मिथ या प्रसंगी गप्पा मारत असताना हॊवर्ड ला म्हणतो, "You dont throw away your ...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...