पुढील वृत्तांत हा माझा ज्येष्ट मित्र (खरतर फक्त या ट्रेक पुरताच) केदार परांजपे याच्या लेखणीतून (का कीबोर्ड तून?) आला आहे. त्याने तो त्यावेळीच पाठवला होता. काही वर्षांपूर्वी (अंदाजे चार सव्वा चार) पूर्ण केलेला हा ट्रेक मनाच्या कोपऱ्यात आहे. काही दिवसांपूर्वी एका मित्राला या गडाची माहिती हवी होती तेव्हा जीमेल सर्च केले. प्रस्तुत लेखात केदारची ओरिजिनल लिपी, काही छोटे मोठे बदल आणि काही छोट्या गोष्टी वाढवल्याची गुस्ताखी केली आहे.
जायचे कसे:
स्वत:चे वाहन असेल तर उत्तमच. नाहीतर, पुण्याहून मुंबईकडे जाणारी कुठलीही ट्रेन पकडावी. बोर-घाट पार करत कर्जत येथे उतरावे. कर्जतहून मुरबाड-कडे जाणारी बस (किंवा खाजगी वाहन) करावी. कर्जतहून शेवटची बस संध्याकाळी ६.०० वाजता आहे.कर्जतपासून ४५ की.मी. वर म्हसा हे गाव लागते, तेथे उतरावे. उजवीकडे देहरी या गावाकडे एक रस्ता फुटतो. म्हसा येथून देहरी १२ की.मी. आहे. खाजगी जीप गाड्या सहज उपलब्ध असतात ( रु. ८/- प्रती सीट). देहरी येथे तुम्ही थेट गोरखगडाच्या पायथ्याशी पोचू शकता.+
वृत्तांत:
आधी ठरल्याप्रमाणे सर्व मंडळी (GS, केदार, गिरी, मिहीर आणि अर्जुन)ठीक सहा च्या सुमारास पुणे स्टेशन वर गोळा झाली. त्यादिवशी पुण्यातील बहुतेक सर्व जणांना रेल्वे ने प्रवास करण्याची शिक्षा दिली असली पाहिजे. तिकिटे काढायला ही तोबा गर्दी! गांडूळाप्रमाणे ९-१० रांगा इकडून-तिकडून वळवळत होत्या. शेवटी त्यातल्या त्यात अल्पवयीन रांगेत शिरलो. इंद्रायणी ६.३० ची होती. आणि बरोब्बर ६.२८ ला तिकीटे हातात मिळाली. उंदराच्या-मागे जशी मांजर लागते तसे आम्ही इंद्रायणी (की उंद्रायणी...) कडे सुसाट
पळालो. थोडक्यात काय, तर ट्रेक ची सुरुवात अशी रोमांचक झाली. असो.
लोणावळ्याला श्री कूल आणि कर्जत ला श्री. दिनेश सामील झाले. राज्य-परिवहन मंडळाची बस मिळते का याचा एक असफल प्रयत्न करून, अखेरीस कर्जत स्थानकावर श्री दिनेश यांच्या हातचा केवळ अप्रतिम असा उंधियो आणि पाव यांचा आस्वाद घेतला. सोबत कर्जतची बोरं होतीच. सुमारे साडे-नऊ ला श्री GS यांनी म्हश्यापर्यंत एक वडाप (याला पुणेकर डुक्कर-रिक्षा आणि पुण्याबाहेरचे टंटं किंवा दुगडूगी असेही म्हणतात) ठरवलं. पुढे चालक आणि दोन्ही बाजूस जय-विजय (त्यांचे सहकारी), मध्ये चार आणि मागे तीन असे बैठकव्यवस्था करून एकदाचा तो वडाप म्हशाकडे कूच करता झाला. मागे बसणाऱ्यांना रस्त्यावरील त्याज्या गोधनाचा आणि डीसेलचा धूर यांचा मिश्र गंध अनुभवता येत होता. वडाप ज्या वेगाने जात होता, त्यानुसार पहाटेपर्यंत म्हसा नक्की येईल असे वाटत होते. भरीस-भर म्हणून चढावावर चालक आणि वडाप यांना मागून धक्का देण्याचे आम्हाला सत्कार्य घडत होते. वीसेक किमी झाल्यावर वडाप गरम झाल्याने सक्तीचा विश्राम घ्यावा लागला. असेच कधी थांबत, तर कधी टेकू देत मार्गक्रमण सुरु राहिले. एका चढावावर (नेहमीप्रमाणे) मागून ढकलत ढकलत वडाप घातल्यावर अचानक चालक-महाशयांनी वडापाने स्वेच्छा निवृत्ती जाहीर केल्याची घोषणा केली. आता हे खरे होते की थाप ते त्या वडापालाच माहित. मुकाट्याने झालेले पैसे चुकते करत सात मराठे वीर पद-यात्रा चालू करते झाले.
रात्रीची ११.३० ची वेळ. फक्त दरोडेखोरांचीच वर्दळ असणारा निर्जन रस्ता. अजून म्हसा किती लांब होते ते कुणालाच नक्की माहित नव्हते. अचानक दिसलंच तर, एखाद्या वाहनाला हे विचारावे तर एवढं मोठं टोळक पाहून थांबण्या पेक्षा दुप्पट वेगानी त्यांची गाडी पाळू लागे. कधी स्वछ चंद्रप्रकाश तर कधी दाट झाडी असे डोक्यावर बाळगत पुढे जात होतो. अखेरीस ०२.३० च्या सुमारास म्हसा आले. आवडता रेड्याला पाहून म्हशीला जितका आनंद होत असेल त्याच्या कितीतरी पट अधिक आनंद आम्हाला म्हशाला पोचल्यावर झाला. त्या-वेळी देहरी ला जाण्यास वाहन न मिळाल्यामुळे, गावातीलच शंकराच्या देवळात विश्रांती घ्यायचे ठरले.
सकाळी ५.०० च्या ठोक्याला सगळे प्रामाणिकपणे उठून तयार झाले. एक-नंबर चहा आणि गरमागरम दूध घेऊन देहरी-कडे प्रयाण केले.
पायथ्याशी पोचेपर्यंत ६.३० झाले. पायथ्यावरून मच्छिंद्रगड, गोरखगड आणि सिद्धगड या त्रयी-नी धुक्याचे उपरणे घालून दर्शन दिले. अर्धे सामान खाली ठेऊन ७.०० ला गड चढायला सुरुवात केली. पायथ्याशी उजवीकडे वळण्या-ऐवजी डावीकडची वाट घेत सोंड चढायला सुरुवात केली. काही वेळातच एका आजोबांनी आमचा आवाज ऐकत, ती वाट गोरखगडाकडे जात नसल्याचे सांगितले नसते तर आज, 'मच्छिंद्रगड-भ्रमण-वृत्तांत' लिहावा लागला असता. असो.
गोरखगडाकडे जाणारी वाट घट्ट पकडून ठेवत, अखेर ९.०० वाजता मुख्य सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो.आता खरी आणि खडी चढाई सुरु होत होती. कातळात कोरलेल्या पायऱ्या सर करत मुख्य गुहेपाशी येऊन पोचलो. तेथे आधीच औरंगाबाद चा एक गट न्याहारीच्या तयारीत होता. गुहेपासून थोडे पुढे गेले की अखेरचा पण अवघड असा चढ येतो. प्रत्येत पाय अचूक नियंत्रण साधत ठेवावा लागत होता. बुडत्याला काडीचा, लेंग्याला नाडीचा, तसा हाताला पायऱ्यामध्ये केलेल्या खोबणीचा आधार होता. त्यामुळेच वर-पर्यंत पोचणे सुलभ झाले.
माथ्यावर गोरखनाथांची समाधी आणि शंकराचे देऊळ साधारण २००० चौ. फूट च्या सपाट जागेत बांधले आहे. सुरेख आहे. उत्तरेस मच्चीन्द्र-गडाचा सुळका, पूर्वेस दमदम्या आणि त्याच्या पलीकडे सिद्धगड सह्याद्रीच्या बलाढ्य रांगांच्या पार्श्वभूमीवर खुणावत होते. सहय पर्वताचे एवढे बलाढ्य रूप एका जागेवरून याच्या सारखं खूप कमी ठिकाणी दिसते. ते रूप नुसतंच नं पाहता त्याचा 'अनुभव' घेण्यासारखं आहे .
खाली उतरताना दुप्पट सावधगिरी घेत सर्व-जण सुमारे १२.०० च्या आस-पास सुळक्याच्या पायथ्याशी परतलो. झप-झप उतरत सगळ्यांनी पायथ्याशी असलेली बाव गाठली. काही प्रमाणात ताजे-तवाने आणि सुस्नात होत, सकाळी जिथे अर्धे सामान ठेवले होते तिथे दाखल झालो. बेत खासा होता. तांदळाच्या भाकऱ्या, कांदा-बटाटा रस्सा, फोडणीचे वरण, भात, कांदा आणि पापड. सोबत खारवलेले काजू (श्री दिनेश यांच्या सहयोगाने). आत्माराम तृप्त झाला.
कर्जत ते म्हसा प्रवासाचा महान अनुभव पदरी असल्याने देहरी ते थेट कर्जत पर्यंत जीप करायचे ठरले. कर्जतला येईपर्यंत अपेक्षेप्रमाणे सिंहगड आधीच गेली होती. ५.०० ची कोणार्क पकडण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. श्री गोरखनाथ कृपेने संध्याकाळी ७.०० ला सर्वजण पुण्यात सुखरूप आणि नंतर आपापल्या घरी दाखल झाले.
- केदार परांजपे याच्याकडून साभार. फोटो - मिहीर देशपांडे, अर्जुन देशपांडे
Comments