Skip to main content

मी किल्लेदार!

माझ्या एका पुतण्याने मला किल्ला बनवायला बोलावले होते, किल्ला बनवताना त्याला त्या किल्ल्यात गुहा हवी(च) होती. खरं तर मी सुद्धा तेवढा होतो तेव्हा किल्ला करताना एकवेळ 'त्यात माणसं दिसली नाहीत तरी चालेल पण त्यात 'गुहा' पाहिजेच',  ही  स्वत:ची मागणी मी केंद्रस्थानीठेवून किल्ला करायचो. (फक्त मागणी केंद्रस्थानी ठेवायचो, गुहा नव्हे! -  वाईट होता. असो.)

हे किल्ला करायचं खूळ दिवाळी च्या १-२ दिवस आधी डोक्यात यायचं आणि पहिला प्रश्न असायचा 'जागा'! स्वतःच्याच वयाची ३-४ टाळकी बरोबर असायची आणि आईचेही तिच्या लाडू, करंजी, चकली, चिवडा यांच्या व्यापातून थोडे फार लक्ष असायचे की ही पोरे किल्ल्या साठी कुठली भिंत खराब करणार. खरतर 'दिवाळी' हीच मुळी आम्हा सगळ्याच पोरांना स्वप्नवत पळवाट असायची. दिवाळी म्हणलं की नो धपाटे, नो राग आणि नो आरडाओरडा  हे आई बाबांचे 'अलिखित' ठरलेले आहे हे आम्हाला जाणवायचं. उठता लाथ बसता बुक्की याची वर्षभर सवय असायचीच त्यामुळे त्यावेळेस  पालकांपैकीच कुणी शिस्त लावायच्या मूड मध्ये आला की आई- बाबां किंवा आज्जी-आजोबांनी 'अगं किंवा अहो आज सण आहे - आज नको रडवू' या वाक्याची मी वाट पाहायचो आणि ते ऐकू आलं की लगेच पळ काढत असे. एकदा मी देवाघरात  असलेला खंडोबाचा घोडा किल्ल्यासाठी न सांगता उचलून नेला. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी पूजा करताना बाबांना कळली. आता तेव्हाची दिवाळी या नियमासाठी एक्सेप्शन होती म्हणा. दरवर्षीप्रमाणे त्याच अंदाजाने तो घोडा मी उचलला होता पण, नंतर आई कडून एक (तिनी चपळपणे मारलेला) धपाटा आणि नंतरचे मी पसरलेले भोकाड यामुळे अगदीच फोल ठरला.  

तरीही अशी घरच्यांची आपल्यावर चीडचीड नंतर नको याची जाणीव असल्याने घराच्या मागच्या बाजूला असलेल्या हौदाची भिंत किंवा एक मोठा बांधा असलेलं आंब्याच्या झाडाला लागून किल्ल्याची जागा फायनल होत असे. हळूहळू तिथेच किल्ल्याचे सामान जमा होत असे. पूर्ण मातीचा किल्ला करण्याइतका पेशंस (किंवा तेवढी माती) कुणातच नसे, त्यामुळे सगळे चहू दिशांना फिरून, जमेल आणि मिळतील तसे दगड गोटे आणून टाकायचे. त्या दगडगोट्यांचा थोडा आदरणीय आकार झाला की मग माती आणणे हे सगळ्यात मोठे काम सुरु होत व्हायचं. एखादे घमेलं नाहीतर तिथेच जमवलेल्या मातीचा अंगणात राडा करायचं काम मित्रामित्रात मोठ्या  उत्साहात केलं जायचं. फाटकी पोती देखील कुणा मोठ्यांच्या मदतीने मिळवली जाउन दगड गोट्यावर टाकली की आपला किल्ला सिंहगडा सारखा होणार नाही पण पर्वती सारखा नक्की होईल अशी खात्री पटायला लागायची. गुहेची जागा मात्र इथपासूनच ठरवायला लागायची. वर टाकलेलं ते पोतं इतकं माती खायचं की ३ ते ४ वेळा तरी मातीचा अंदाज चुकायचा. पोरं माती आणून आणि हातांनी खणून खणून दमून जायची. छोटे छोटे खडे नखात अडकले असले तरी खणण्याचा उत्साह एवढा पराकोटीचा असायचा की माती ची गरज संपेपर्यंत तो कमी व्हायचा नाही. कितीही चिख्खल थापला तरी पोत्याच टेक्श्चर हे चिखल वाळला की दिसायचंच, पण थोड्या वेळानी किल्ले उभारणीच्या मातीच्या (थाप)कामा मध्ये यश यायचंच. इथून पुढे सुशोभीकरणाचे काम सुरु व्हायचे. 

आपल्याकडे उपलब्ध असलेली खेळणी यांचाच विचार करून बऱ्याचदा फक्त त्या खेळण्यांकरता म्हणून जागा बांधणी सुरु व्हायची. मला खरतर आयुष्यात एकदा तरी एकदम पुरातन काळचा किल्ला करायचा होता, पण एक प्लास्टिकची कचकड्याची जीप आणि एक सायकल हे संग्रहात असल्यामुळे किल्ल्यावर रस्ता बांधणे 'मस्ट' होतं. शिवाय सिंहगडावर वरपर्यंत जाणारा रस्ता आहेच ना, मग आपल्या किल्ल्याला ती सोय का नको हा प्रश्न ही मला त्यावेळी महत्वाचा वाटत असेल, पण बिन रस्त्याचा किल्ला मी कधी केलाच नाही हे मात्र खरं. तर मग बुरूज, महाराजांची जागा, कमीत कमी दोन टेहाळणी बुरुज, तोफेची जागा ती सुद्धा किल्ल्याच्या प्रत्येक बाजूला तोंड करून असेल याच विचार करून बांधलेली असायची. माझ्या खेळण्यांमध्ये नाकं, हात किंवा तलवारी तुटलेले मावळे ही होते. त्या मावळ्यांना निवृत्त करायचंही  जीवावर यायचं. मग त्यांना किल्ल्या मागे दर्शनीय नसलेल्या भागात रक्षण करायला लागायचं. 

किल्यावर नागमोडी रस्त्याला काडेपेटीच्या काड्यांचे कठडे बांधले जायचे. वाघजाईच्या मंदिरा समोर गेरू चा दगड मुबलक प्रमाणात असायचा, आम्ही सगळी मुलं गेरू गोळा करायला तिथे जात असू. गेरूचा भुगा किल्ल्याच्या रस्त्यावर टाकला की रस्त्याला कोकणातल्या  लाल मातीचा फील यायचा. अळीव, कोथिंबीर यांच्या बिया टाकल्या आणि किल्ला हिरवा गार दिसू लागला की बाल मनातला, पावसाळ्यात भिजलेला राजगड किंवा लोणावळा खंडाळा डोळ्यापुढे येई. किल्ल्यावरच्या गुहेच्या बाजूला जरा जास्त जंगल तयार करायची सोय करणं साहाजिकच होतं, त्यामुळे तिकडे बिया जरा जास्त टाकल्या जात. पुढे झाडं उगवेपर्यंत 'ती येणार की नाही' याची धाकधूक होत असे. माझ्या ४ वर्षाच्या भाच्चीच्या घरी गेल्या वर्षी किल्ला केला होता. तिचा (आणि तिच्या वडिलांचाही :-D) दिवाळीभर एकाच उद्योग होता - 'सतत किल्ल्यावर पाणी मारत राहणे'. त्यामुळे झालं काय की त्या किल्ल्यावर अळीव, कोथिंबीर याशिवाय इतरही इतकी झाडं आली की त्या किल्ल्याला 'जावळीच्या खोरयातला प्रतापगड' असं नाव दिल असतं तर ते पण खपलं असतं.
    
किल्ल्याची नैसर्गिक सजावट वगैरे सगळं ओके झालं की, विषय असायचा पायथ्याचं गाव. तिकडे एक छोटा खड्डा खणून हिंगाची डबी रुतवली की विहीर तयार व्हायची. कळशीवाल्या बायका, संगहात असतील तर कुत्री, यांची रवानगी विहिरीच्या आजूबाजूला असायची. इतरही अनेक आवश्यक अनावश्यक गोष्टी जमेल तश्या बांधल्या जायच्या. माझ्या लक्षात आहे असंच एके वर्षी, माझ्या कडे हात पाय तुटलेले मावळे खूप झाले होते, तेव्हा त्यांच्या साठी मी स्मशानगृह पण बांधले होते. :-)

अजून एक 'पाहिजेच' अशी गोष्ट होती ती म्हणजे 'कारंजे'. हे खूळ नक्की कुणी डोक्यात घातले माहित नाही, पण त्या सलाईन च्या ट्यूबसाठी आमच्या डॉक्टरांना माझ्या पेक्षा जास्त कुणी छळले नसेल. शेवटी इच्छा नसूनही ते डॉक्टर एखादी कोरी करकरीत पिशवी आणि ट्यूब आम्हा बच्चे कंपनीच्या हवाली करत असत. हौदाला लागून किल्ला केला असला तर कारंजे चालू राही, पण पाण्याच्या सोर्स पासून लांब किल्ला असेल तर मात्र सतत लागणाऱ्या प्रयत्नांमुळे कारंजे, निरुत्साहापोटी बंद अवस्थेतच दिसे. उगाच कुणी मोठं किंवा एखादा मित्र किल्ला पाहायला आला की त्यांच्यापुरतं कारंजे चालू केलं जाई आणि त्यांनी आश्चर्याने आं वासला की लगेच बंद पण केलं जाई.
    
सगळी खेळणी किल्ल्यावर ठेवली की 'किल्ला केला' यापेक्षा 'किल्ला बांधला' असाच आनंद होत असे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आई आवर्जून एक दोन पणत्या किल्ल्याच्या आजूबाजूला ठेवत असे, तेव्हा तर छाती शिवाजी महाराजांपेक्षा जास्त फुलून जात असे. महाराजावरून आठवलं  . . . .दोन तीन वर्षं माझ्याजवळ सिंहासनावर बसलेले महाराज नव्हतेच आणि जे होते ते एक गुडघा टेकलेले आणि उभी नंगी तलवार असलेले होते. साहजिकच महाराजांना अश्या अनयुजुअल पोज मध्ये दरबारी विराजमान झालेलं पाहून हशा होत असे. पण आमचा कुणाचा अभिमान मात्र तसूभरही कमी होत नसे.

अंगणामध्ये नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे ४ वाजता अंघोळ करून कपडे घालून पहिला सुतळी बॉंब उडवायच्या धांदलीतही थोडेसे का होईना किल्ल्यावर जरूर लक्ष असे. क्वचितप्रसंगी पानपट्टी, नाग-गोळ्या, धागे काढलेली एकेक लवंगी, तडतडीची फुलबाजी असले किडूकमिडूक फटाके थेट किल्ल्यावरच उडवून किल्ल्याची तटबंदी भक्कम आहे की नाही याची शहानिशा (अर्थातच अजाणतेपणाने) होई.                   
  
खूप लहानपणीच एकदा पर्वती वरून रमत गमत येता येता शिवदर्शन चौकाजवळ एका हौशी घरी, त्यांनी केलेला किल्ला पहिला होता. अजूनही तिथे तो किल्ला दिवाळीत दिसतो. त्यात सगळंच असतं. धरण, पूल, विमानतळ, इमारती, विमानं, पोलीस, रुग्णवाहिका, बस वगैरे वगैरे खूप गम्मत वाटते आणि त्यांच्या कुंपणालाच  लागून किल्ला पाहायला लहानांचीच काय थोरांचीही गर्दी जमते. हे लिहिताना मनात विचार येतोय; जशी लहान मुलं किल्ला बनवतात त्या वेळेस ती किल्ल्यापेक्षा कल्पनाशक्ती मध्ये जास्त रमलेली असतात. माणसं मोठी झाली की त्यात भाग घ्यायला सोयीस्करपणे विसरून का जातात?

माझ्या बरोबर च्या मोठ्या माणसांना दीपावली आणि नूतन वर्षानिमित्त एवढीच शुभेच्छा आहे की . . ' तुमची सुकृत निर्मितीची इच्छाशक्ती एखाद्या लहान मुलाच्या कल्पनेप्रमाणेच सतत सळसळती राहो आणि तुमच्यातल्या लहान मुलाला (जेणेकरून तुम्हाला) न्याय मिळो.'

शुभ दीपावली! :-) 

Comments

Anonymous said…
I agree.... missed those days.....
Anonymous said…
Chan ahe avadala lekh, tumhchihi kalpanshakti ani Srujanshilata ashich fulat raho ani amhala asech changle lekh vachala milo hich apeksha!

Prasad Sapte
Unknown said…
khupach sunder lekh...mana pasun bhavala... :)
वाचता वाचता मी ही माझ्या बालपणात हरवून गेलो.
चपळ धपाटा... म्हणजे पळत पळत खाल्लेला आणि आईने चपळाई ने नेम धरून दिलेला धपाटा. बरोबर ना? खाल्लाय म्हणून माहिताय.
एकदा माझ्या कडे एक गाडी आणि एक पोलीस होता. त्याला आणि इतर काही जणांना किल्ल्याच्या पायथ्या जवळच्या गावात ठेवलं आणि सांगितलं की त्यानं smuggling चा माल पकडलाय. :D गंमत असायची.
Unknown said…
अनामिक १ - धन्यु
Unknown said…
अनामिक २ - धन्यवाद अन ब्लोग वर स्वागत, भेटूयात असेच अधून मधून!
Unknown said…
विशाल - आता या दिवाळीत किल्ला करू
Unknown said…
अगदी बरोबर प्रसाद, धपाटे २ प्रकाराराचे असतात.
पहिला म्हणजे पोरगा हातात आलाय (म्हणजे त्याचा एक दंड पकडून प्रहर केला जायचा - आणि त्या दणक्याने ते पोर पुढे जायचं),
अन दुसरा म्हणजे हा चपळ वाला.
(पोरगा जरासं रेंज मध्ये आलं की फायर! )

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च