पाच ते सात वर्षापूर्वी . . . .
टेलिफोन वर
निखील : काय रे, काय चालू आहे? कुठे घालतो आहेस? संध्याकाळी फो न करतो म्हणला होतास.
मी: अरे येतोच आहे घरी. बाबांनी काम सांगितल होतं, तेच आवरत होतो.
निखील : आपला प्लान ऑन आहे ना अजून? काय प्यायचं मग आज?
मी : अरे हा काय प्रश्न आहे! आपण काय कमावते आहोत का अजून? ओल्ड मंक - दोन क्वार्टर्स १०० रुपये होतील . . . . . पुरतील का?
निखील : पुरतील पुरतील! थम्प्स अप आणि चकणा, चौकातल्या मारवाड्या कडून आणा. तू आणि पद्या जा रात्री, ते हरामी बसलं असेल गर्लफ्रेंड बरोबर कॉलेजच्या ग्राउंड वर. त्याला फोन करतो आत्ता.
मी : अरे चूXX आणि जेवायचं काय? नेहेमीचंय तुझं. लास्ट टाईम चिकन बिर्याणी आणली स्वस्तातली . . . नुसता तिखट लावलेला भात होता तो. चिकनच्या एका बारक्या पीस साठी किती हमरा तुमरी झाली होती आठवतीये का?
निखील: आई बाबा रात्री ७ ला निघतील. ते गेल्यावर घरी कुणीच नाहीये. मग आपण बुर्जी बनवू घरी आणि ब्रेड आणू. डन का?
निखील: आई बाबा रात्री ७ ला निघतील. ते गेल्यावर घरी कुणीच नाहीये. मग आपण बुर्जी बनवू घरी आणि ब्रेड आणू. डन का?
मी : मी अभ्याला कळवतो. तू पद्याला मला फोन करायला सांग. आणि काका काकू गेले की मला फोन कर, म्हणजे मी तुझे पैसे घ्यायला येतो आणि 'सामान' आणतो.
निखील : अरे चौघात हाफ पुरेल का? का आणायचा खंबा? . . . १९६ रुपये होतील.
मी : खरं यार, मला पण वाटतंय कमी पडेल. पैसे नाहीयेत पण. बघू . . .
निखील : अरे पप्पा देतील मला जाताना, मी भरतो आत्ता, नंतर द्या मला.
मी : लई भारी! भेटू मग. :-)
- - - - - - - - - - X - - - - - - - - - - -
यथावकाश रात्र उजाडते, मित्रांना फोन केले जातात. 'सामान' - म्हणजे कुठल्या तरी अमुक अमुक वाईन शॉप मधून ओल्ड मंक चा खंबा, थम्स अप ची दीड लिटर ची बाटली, खारे दाणे, थोडं फरसाण आणि थोडे तिखट वेफर्स आणले जातात. कुणीतरी सजेस्ट करतो की कोरडी भेळ आणू, मग ती पण आणली जाते. अभ्या अजून आलेलाच नसतो, त्यामुळे त्याच्या आई बापाचा उद्धार सगळे जण मिळून करतात. घरी सगळी 'तयारी' समोर मांडलेली असते आणि सगळे फक्त अभ्यासाठी थांबले असतात. पद्या उठतो आणि सिगारेटच पाकीट काढतो. जेमतेम बारावी पास, नवीन मिसुर्डी फुटलेली पोरं आम्ही, आमच्या साठी हे नवीन असतं. मला आवडत नाही तरी मी गप बसतो, पण निखील पद्यावर उचकलेला असतो. एक तर त्याला पद्याबरोबर दोन-तीन ईश्शुज डिस्कस करायचे असतात आणि त्यात खुद्द फिटनेस फ्रिक असलेला तो, त्याचा बेस्ट फ्रेंड सिगारेट पितो हे सरप्राईझ एकदम एकावेळी सहन करण्याची ताकद किंवा पेशंस त्यात नसतो. तेवढ्यात अभ्या चा सायकल ठेवल्याचा आवाज येतो. दोन मिनटात दाराची बेल वाजते. आल्या आल्या अभ्यावर शिव्यांचा वर्षाव होतो.
सगळ्यांचं झाल्यावर अभ्या अपराधी भावनेने म्हणतो, "अरे जेवूनच आलो म्हणून उशीर झाला, घरी सांगून आलोय, निखीलकडे रात्री अभ्यासाला जातो म्हणून . . ही बघ पुस्तकं पण आणली आहेत." सगळे जोरजोरात हसायला लागतात आणि 'चला, सुरु करू!' या अविर्भावात 'सामान' मांडलेल् या छोट्याश्या बाल्कनी मध्ये कूच करतात.
''मला नको यार जास्त'' चा कित्ता गिरवणारा अभ्या, नं झेपेल एवढी पिणारा होता. त्यांनी पहिला पेग भरायला घेतला. पद्या हुकुम दिल्या सारखा अभ्याला म्हणला, "पहिला 'कडक' कर रे, मग निवांत घेवू." सगळ्यांचे डोळे, ओतलेल्या ग्लास मधल्या रमच्या लेवल वर होते. शेवटी यात कमी, यात जास्त असं करत करत पहिला पेग चांगलाच कडक झाला. नं चुकता चिअर्स करून, पहिले घोट घेतले गेले, आणि ब्रह्मानंदाचा साक्षात्कार झाल् या सारखे सगळ्यांचे डोळे आणि चेहरे कृतकुत्य झाले!
सगळ्यांच्याच डोळ्यात आपण काहीतरी थरारक करत आहोत असा भाव होता. हळूहळू इकडचे तिकडचे गॉसीप झाले. कोण पोरगी कशी आहे, कुठल्या पोराला लाईन देते, का सगळ्याच पोरांना देते, या पासून ते अभ्यास, शिक्षक, जिम, नातेवाईक या सगळ्याच विषयांवर, प्रत्येकजण स्वतःची मते नं लाजता देउ लागला. शाळेपासून एकाच टीम मध्ये क्रिकेट खेळणारे आम्ही होतो त्यामुळे सचिन तेंडूलकर कसा भारी आहे, आणि त्याच्यामुळे रिकीची कशी बसली गेली हा नेहेमीचा विषयही होता. एक 'कडक' आणि त्यानंतरचा अजून लहान पेग कधी संपला कळलंच नाही. एव्हाना सगळ्यांनी खाली बसल्या बसल्या स्वत: साठी हात पाय पसरता येईल अशी जागा केली होती. तेवढ्यात मी बर्फ तोडता तोडता निखिलला बोलायचं होतं तो विषयही पुढाकार घेउन पद्याकडे काढला -
"पद्या, रश्मी आवडली आहे निख्याला."
पद्या - "कोण रश्मी?"
अभ्या - "अरे रश्मी रे, शेजारच्या रो मध्ये बसते बघ. रश्मी कुलकर्णी."
पद्या - "मग?"
मी -"अरे मी म्हणालो निख्याला टाक विचारून, भेटतेस का म्हणून. आणि भेटली तर कर प्रपोज. पण हा म्हणतोय पद्या ला विचारायचं आहे. आपल्या मध्ये पहिली पोरगी तू पटवलीस ना म्हणून म्हणला की तू सांगशील."
(निखीलची लाजायची परिसीमा झाली होती)
पद्या - (तिखट वेफर ची स्लाईस उचलत) "टाक ना बिंदास विचारून निख्या. आय काय नाही काय! पटली की अजून एक पार्टी करू. ओळख तर काढून घे आधी आणि मग एकदम confidently विचारून टाक ' आय लाव यु ' म्हणून."
पुढची दहा मिनिटं पद्या बोल बोल बोलत होता, आणि आम्ही,'किती काय शिकायला मिळतंय आणि जन्म सार्थकी लागतोय हे बोल ऐकून' या भावनेने पद्याचे ते बोल कीर्तनात वारकरी रंगतात त्या रीतीने ऐकत होतो. निखील ने एक शंका म्हणून पद्याला मध्येच विचारले - "आणि ती नाही म्हणाली तर?"
मी लगेच उपदेश दिला - "कर्म कर निख्या, फलाची अपेक्षा नको करूस! फळ आपोपाप मिळेल बघ."
(हे असल काही मी विचार करत नव्हतो - कसं काय सुचलं मला हे हा विचार करीत मी ग्लास कडे निरखून पाहिलं - तिसरा संपला होता . . . . तरीच!)
या माझ्या उत्तराने कसं कुणास ठाउक निख्याच समाधान झालं.
तेवढ्यात पद्या उठला. करंगळी दाखवत जाऊन येतो म्हणला.
अंधारात स्वत: चा तोल सांभाळत जाताना तो एखाद्या अंतराळ मानवासारखा चालत गेला. दारू चढणे म्हणजे 'चंद्रावर जाणे' हा वाक्प्रचार का आला असेल हे मला तेव्हा कळलं.
निखील - भूक लागली आहे यार. बुर्जी करू.
अभ्या - चला. करू.
मी - कांदे कापावे लागतील.
अभ्या - दे मला आणून. मी कापतो.
मी त्याला कांदे आणून देतो, आणि त्याची गम्मत करायची म्हणून विळी आणून देतो. अभ्या डोळे विस्फारतो आणि काही नं बोलता कांदे सोलायला लागतो. माझा पोपट झाल्यामुळे मी ही काही बोलत नही आणि आत जातो. तेलाचा डबा शोधायला लागतो. कढई शेगडीवर ठेवून शेगड़ी ऑन करतो.
"आईच्चा! सिलिंडर संपला यार!" मी ओरडून निखीलला सांगतो.
निखील - "हा इकडे या टेबल च्या खाली या कोपऱ्यात ठेवला आहे दुसरा. बदलून टाकू."
मी - "पद्या भाड्या, नुसता वर करून टीव्ही काय पाहत बसला आहेस, इकडे ये मदतीला." (मला पद्याचे ते जहागिरदारासारखे वागणे इरिटेट होऊ लागले.)
पद्या - "एक सिलिंडर बदलायचा. कशाला हवी तीन तीन टाळकी?"
मी - "अरे कुत्रीच्या, इकडे ये आधी. टेबल उचल. मी मागचा सिलिंडर काढतो.
निखील गाल्यातल्या गालात हसत असतो. मा झी पद्या वर होणारी चिडचिड त्याला समजत असते. पद्या जबरदस्ती केल्यासारखा उठतो आणि टेबल उचलतो."
पद्या - "चायला! उतरली टेबल हलवून. आता एक एक पेग मारू अजून अन मग बदला सिलिंडर."
खरतर पाच दहा मिनिटे झालेली असतात. त्यामुळे पद्याची ही कल्पना लगेच पटते. आणि आम्ही परत आमच्या पार्टी प्लेस कडे जायला लागतो. अभ्या इकडे डोळ्यातून पाणी आणू आणू, विळीवर कांदे चिरायचा प्रयत्न करत असतो , आणि समोर टीव्ही बघायचा ही प्रयत्न करत असतो.
निखील - "अरे अभ्या झाम्या, काय कांदे चीरलेत की लिंबू! बारीक चिरायला सांगितले होते ना?"
अभ्या - (मख्खपणे पाहत) "सुरी का नाही दिली मग . . . खा आता मोठ मोठे कांदे."
निखील पाय आपटत किचन मध्ये जावून अभ्याला सुरी आणून देतो.
तोपर्यंत मी पुढचा पेग तयार करतो. पुन्हा गप्पा चालू होतात. या वेळेस अभ्या विषय काढतो.
अभ्या - "पद्या, त्या रीना झावरे चं काय झालं? तुटलं का तुमचं ?" . . . .
निखील - "म्हणजे ब्रेक अप झालं माहितीये सगळ्यांना, आता तू कल्पना बरोबर लफड्यात आहेस ना. पण रीना का संपलं, हे बोलला नाहीस तू कधी?"
मी - (काडी लावत) "पण निखील, पद्या साठी कल्पना पेक्षा जास्त रीना चांगली होती, नाही का?"
पण पद्या गप्पच असतो. त्याचा एकदम देवदास होतो. त्याच्या मुळावर घाव घातलेला असतो ना!
पद्या - "Top to bottom? मग सांगतो."
आम्ही सगळे जण स्वत:च्या रम च्या ग्लास मधल्या लेवल कडे बघतो आणि नाईलाजाने तयार होतो - इज्जत पणाला असते. सगळे जण इमानदारीत ग्लास तोंडातून नं काढता रिकामा करतात आणि आशेने पद्या कडे पहायला लागतात.
पद्या सुरु होतो . . . "रीनाच्या आधी स्वाती आणि तिच्या आधी कल्पना दोघींबरोबर तुटलं पण मला झ्याट फरक नाही पडला. रीना गेल्यावर ऑफ झालो होतो पण. निळ्याच्या बर्थडे पार्टी ला आलो नाही ना त्याच कारणामुळे. त्याच दिवशी सांगितलं तिनी, नाय जमणार आपलं, तिचा बाप तिचं लग्न ठरवत होता म्हणाली. ती म्हणली त्यांच्या घरात १८ व् या वर्षी लग्न करून द्यायची पद्धत आहे. पुढच्या वर्षी करेल बघ ती." पुन्हा पद्या बोल बोल बोलला.
या वेळेस आम्हाला सगळ्यांनाच जाणवल की पद्याचे चांगलेच विमान होऊ लागले आहे. अभ्या, निख्या आणि मी सुद्धा पद्याच्या त्या फुटक्या नशीबा बद्दल अधून मधून शिव्या पेरत पेरत मोकळे होत होतो आणि त्याचा भार हलका करत होतो.
होता होता सेकन्डलास्ट पेग भरला. मला उगाच बुर्जी ची आठवण आली. निख्याला कोपऱ्यानी भोसकल आणि विचारलं 'निख्या बुर्जी राहिलीये. चल करू' पद्या अगदीच सेंटी झाला होता, त्याला थांबवून, मी त्याला त्याचा आजोबा असल्यासारखा उपदेश केला,
'अरे, पद्या सोड आता, झालं गेलं वाईट झालं, पण आता डोंट वरी. या वयात आपण प्रेम करतो या भावनेवरच जास्त प्रेम करतो. पोरी काय हजारो येतील. पण एक गेली म्हणून रडत बसण्यात काय अर्थ आहे. आमीर खान बरोबर बोलतो - ट्रेन, बस और लडकी . . . ."
"एक गयी तो दुसरी आती है" - पद्यानी माझे वाक्य पूर्ण केले. ओल्ड मंक चा मनातल्या मनात जयजयकार करून मी उठलो.
अभ्याला परत हुकुम सोडला, "कांदे झाले का रे!"
इतका वेळ बाजूला ठेवलेले अर्धवट चिरलेले कांदे पुन्हा मांडीवर घेवून तो आता सुरी नि कापायला लागला. मी आणि निख्या आत गेलो, सिलिंडर च्या सील ला दोरा नव्हता. खूप फ़ाईट मारल्यावर चमचे स्क्रू ड्रायवर वापरून कसंबस सील निघालं. तेवढ्यात मागून एक किंकाळी ऐकू आली. मागे वळून पाहिलं तर अभ्या रस्त्यावर लिफ्ट मागत असल्या सारखं डावा हाताचा अंगठा बाहेर काढून हात हलवत आमच्या कडे पाहत होता. मध्येच त्याने त्याचा अंगठा कापून घेतला होता.
आम्ही तिकडे जाईपर्यंत, पद्याने त्याच्या मांडीवरची ता टली उचलली आणि २ सणसणीत शिव्या घातल्या, "उठ यडझव्या, बेसिन वर हात धर!" - एवढं बोलून तो जैसे थे स्थितीत सोफ्याला टेकून बसला. मी अभ्या बरोबर बेसिन जवळ गेलो आणि त्याचा हात पाण्याखाली धरला. अभ्या त्याचं बोट कापल होतं तरी फे फे हसत होता. "अरे दात का काढतोय?" असा विचारलं तर अजून मोठ्यानी हसत होता. निखील फर्स्ट एड कीट शोधायला गेला. थोड्या वेळात अभ्या च्या जखमेच ड्रेसिंग केलं. बाहेर येउन बघतो तर, पद्याचे डोके आणि हात सोफ्यावर आडवे पसरलेले होते आणि तो जमिनीवर बसला होता. एव्हढ्या विचित्र पोसिशन मध्ये असून सुद्धा घोरत होता. याला उठवण्यात अर्थ नाही म्हणून परत बुर्जी करायला गेलो. दहा पंधरा मिनटात बुर्जी झाली, तर पद्याच्या समोरच्या सोफ्यावर आता अभ्या पण आडवा झाला होता आणि त्याने तर पांघरूण पण घेतले होते. बनवलेली एवढी बुर्जी मी आणि निखील नी कशी बशी शेवटच्या पेग बरोबर संपवून टाकली.
सगळं सुखा-समाधानात झाल्याबरोबर, इकडे तिकडे पसरलेला कचरा पसारा आवरायला मी निख्याला मदत केली आणि गप्पा मारता मारता आमच्यावर पण निद्रादेवी कधी प्रसन्न झाली कळलेच नाही.
- - - - - - - - - - X - - - - - - - - - - -
परवा निख्या भेटला होता. म्हणाला, "घरी एका कोपऱ्यामध्ये बार डीझाइन करत आहे, पण घरी चोरून केलेल्या त्या पार्ट्यांची सर आता कधीही पुन्हा येणार नाही."
Comments
फारच आवडले मला. खरंय तुजे अर्ज्या, ते दिवस खरच सोनेरी होते आणि काही जाले तरी ती मजा आता परत नाही येणार.....
Deshpande . . . naaw shobhatay baraka! Chhan! shabda chhan wapartos!