Skip to main content

विदारक

नेमकं केव्हा आठवत नाही. लहानपणी 'विदारक' या शब्दाची ओळख फार गम्मतशीर पद्धतीने झाली. 

आमच्या घराच्या अंगणात नारळ, अशोक, आंबा, जांभूळ, फणस असे डौलदार वृक्षराज होते, त्यांच्याबरोबर चिकू, डाळींब, राय आवळा, पेरू अशी त्यांची आकारानी छोटी असलेली भावंडेही एकत्र गुण्या-गोविंदानी नांदत असत. बागेत पाच सहा गुलाब, कर्दळ, रातराणी, चाफा,शेवंती, मोगरा, गार्डन लिली, ग्लाडीओला यासारखी फुलझाडे, या व्यतिरिक्त ज्यांना कधीही फुले येणार नाहीत अशी रबर, सायकस, बेडकीचा पाला, फायरबॉल, लाल कोवळी पाने असलेली झाडे, लाजाळू अशी नुसतीच शोभेची झाडे तसेच काही जुजबी भाज्या म्हणजे अळू, कढीपत्ता, बडीशेप वगैरे. अश्या भरपूर वृक्ष समूहाच्या सावलीमध्ये आणि अंगाखांद्यावर माझे बालपण गेले. नाही म्हणायला, घरासमोर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शाळेच्या आवारात डिंकाचे आणि त्याच्या शेजारी निम्बाचे असे दोन मोठे वृक्ष दरबानासारखे उभे असत. 

ह्या डिंकाच्या झाडाशी माझी खूप गट्टी जमली होती. एक तर असं वेगळे चिकट चिकट झाड म्हणजे माझ्या बाल मनाला त्याचे जास्त कुतूहल आणि त्या झाडाची जागा इतकी मोक्याची होती की त्या झाडावर चढलं की घर, घरासमोरचा रस्ता,  ते झाड ज्या शाळेच्या आवारात होतं त्या शाळेचे वर्ग सगळे अगदी छान दिसत असे. त्याचा शेजारीच काहीसे त्याच शाळेच्या आवारात गेटच्या शेजारीच भले थोरले निम्बाचे झाड होते. चढायला खूप अवघड होते ते, म्हणून त्याच्याशी गट्टी जमली नाही मात्र ते माझ्या आणि डिंकाच्या दोस्तीचे साक्षीदार होते म्हणून तसे जवळचेच होते. 

माझ्या घरातले पेरू चे झाड दिवाळीच्या सुट्टीतले एक नंबर दोस्त. फक्त 'ते नाजूक असते फांदी मोडू शकते' अशी आजोबांनी तंबी दिली असल्याने त्याचाशी जरा आदर ठेवूनच खेळायचो. पेरूच्या शेजारीच खूप मोठ्ठा सरळसोट वाढलेला राय आवळा होता. त्याच्या बुंध्याला सगळीकडून नुसते आवळे लगडले असत. एकदा अश्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर आवळे खाल्ले, त्या दिवशी संध्याकाळी घश्यामधून शब्दच फुटत नव्हता असा घसा खराब झाला होता. त्या वेळेस एवढ्या आवळ्यांनी लगड्लेलं झाड पाहिलं नव्हता - म्हणून तोबरेच्या तोबरे भरून आवळे हाणले होते. घराच्या दारासमोर तुळशीव्रुंदावना शेजारी असलेल्या लाजाळूच्या झाडाशी तर मी इतका खेळलो आहे की विचारू नका. त्याला सतत पाणी घालणे, तेव्हा मिटणार्‍या पानांकडे पाहणे. हळूहळू पाने उघडली कि पुन्हा हातच लावणे असे उद्योग तासन्तास चालत असत. घराच्या मागच्या बाजूला नारळाच्या झाडाच्या अळ्यातच एक फणसाचे झाड आले होते. काही वर्षातच त्याला तुरट फणस सुद्धा लागले होते. तुळशीच्या मागे एक 'अशोक' झुलायचा. खूप वारा सुटला ना की डोल बाई डोल करणार्‍या त्याच्याकडे बघत बसायला गम्मत वाटायची. नकळतपणे याच आणि अश्या सगळ्या सोबतीं बरोबर मी मोठा झालो.

तिसरी -चौथीत असेन. एके दिवशी शाळेतून आलो.  रिक्शावाल्या काकांनी दारात सोडलं. दुपारची वेळ. एकदम खूप उजेड जाणवला. आजूबाजूला पाहिलं तर सगळं मोकळं मोकळं वाटलं. "डिकाचे झाड दिसलेच नाही." धावतच त्या शाळेत गेलो. समोर बघतो तर २ मजली इमारतीं एवढा तो व्रुक्ष बुंध्यापासून अगदी माणूसभर उंची ठेवून इतक्या पट्कन कापलाही गेला आहे. "अरेच्च्या, सकाळी तर होतं हे झाड!" - मी माझ्या मनाशीच म्हणालो. झाडाची पाने, फांद्या इतस्ततः विखुरलेल्या होत्या, त्यातून रस्ता काढत मी त्या झाडापर्यंत पोहोचलो आणि त्या बुन्ध्याला हात लावला. एकदम मला माझी आज्जी आठवली. "ती गेल्यावर्षी गेली. त्या वेळेस म्हणजे जाण्याच्या दिवशी तिने माझा हात हातात घेतला होता - मोठा हो म्हणाली. खूप आजारी होती ती. खूप आठवण येते तिची. पण ती गेली देवाघरी."

दप्तर संभाळत मी घरी आलो.  खूप आठवण आली झाडाची. चार वाजता आई नौकरी वरून आली. मी बिलगलो तिला. म्हणालो कि डिंकाचे झाड तोडले आज! एकदम रडूच कोसळले. ओक्साबोक्षी, हुंदके देत खूप वेळ रडलो. आईने समजूत काढली, तेव्हा हळू हळू रडायचे थांबलो.

आईच्या सांगण्यावर ग्रुहपाठ करायला बसलो. पाहिला प्रश्न होता-

वाक्यात उपयोग करा -
कुर्‍हाड कोसळणे
जीवावर उठणे


समानार्थी शब्द लिहा
विदारक

Comments

Unknown said…
इंद्रधनू - खूप आभार! :) तुमच्या अश्या कमेंट्स मुळेच अजून लिहावसं वाटते.
Unknown said…
तेजस - अचानक आले यार! :)
सुंदर लिहिलेयस.
Unknown said…
Thanks Prasad! :)

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...