Skip to main content

नशीब

फुटके नशीब किंवा कपाळ करंटेपणा हा वैयक्तिक नसतो - तसा जागतिकच असतो. कालच एका वन वे बोळातून मोटारीतून जात असताना अचानक समोर बस आली - पर्याय नसल्याने मला पुढची मार्गक्रमणा बस मागून करावी लागणार होती. पुढचा दहा  मिनिटांचा  प्रवास  हा आता बस मागोमाग करावा लागणार, शिवाय बस थांब्यावर दर दोन मिनिटांनी बस बरोबर वाट पाहत थांबावे लागणार या कल्पनेने मी म्हणालो, "काय फुटकं नशीब आहे - आपल्याच बाबतीत असे कायम घडते!"


फुटकं  नशीब असा म्हंटल्याबरोबर गौतम बुद्धाची नशिबाची व्याख्या आठवली. तो म्हणाला होता - सखोल ज्ञान आणि  तशीच  कुशलता असणे, शिवाय सुशिक्षित असूनही चांगली भाषा असणे म्हणजे नशीब.  आता ही व्याख्या बसच्या मागून निर्विकारपणे गाडी चालवताना कुठे लागू होते हे माझ्या कळण्याच्या बाहेर होते.


यथावकाश जिथे - ज्या कार्यक्रमला पोचलो, तिथे एक हल्लीच पुण्यात शिफ्ट झालेला मित्र भेटला, तो त्याच रस्त्यांनी आला होता. त्याच निमुळत्या रस्त्यावर माझ्यासारखीच त्याच्या मोटारीपुढेही  अचानक बस आली होती आणि शिवाय मागेही; भरीस भर म्हणून त्या गल्लीत एक मोटारसायकलवाला त्याच्या शेजारून गाडी चालवत गिचमिड वाढवत होता. इतक्या सगळीकडे बघत बघत जात असल्यामुळे पुण्यामध्ये नवीन असलेला तो रस्ता मात्र चुकला नाही आणि व्यवस्थित वेळेत कार्यक्रमाला हजर झाला.


मनातल्या मनात बुद्धा सारखीच नशिबाची व्याख्या माझ्यापरीने मी लगेच तयार केली - नशीब म्हणजे रस्त्यावरून हळू हळू जाणे, कारण रस्ता चुकायचे भय तुम्हाला त्यामुळे राहत नाही. :)

हल्लीचे जग, प्रत्येकाचे आयुष्य इतके स्पर्धात्मक झाले आहे नं, कि प्रत्येकजण नुसता पळत असतो. बऱ्याचदा मार्गात अडथळे येतातच, आणि असे कि त्यांच्यापुढे कुणीच काही करू शकत नाही.  तुम्हाला  बळेच  सावकाश  जावे लागते. आयुष्यात अश्या सावकाश जाण्याने जरी तुम्ही स्वत:ला कमनशिबी म्हणवून घेतले तरी त्यामुळे तुमच्या हातून चुका होण्याची शक्यता खूपच कमी असणार आहे हा फायदाही होतो.      


आयुष्याच्या बाबतीत हे किती समर्पक आहे  याचा असा विचार झाल्याने स्वतःची हि कल्पना स्वतःलाच  आवडली. अश्याच कुठल्या ना कुठल्या विचारात परतीचा रस्ताही धरला.

Comments

चला.. पुण्यातले ट्राफिक ने १ तरी चांगले काम केले म्हणायचे.. असेच तुम्हाला उत्तरोत्तर बुद्ध्संदेश प्रचीतीस येत जावोत हि सदिच्छा !!!!! ;) ;)

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...