काही माणसांचा मला फार हेवा वाटतो. ज्यांच्याकडे नवनिर्मिती किंवा कल्पक विचार करण्याची अद्भूत क्षमता असते तसे लोक. त्यातूनही ज्यांच्या विचारात जग बदलायची ताकद असेल ते लोक तर विचारूच नका.
परंपरावादी, कट्टरपंथीयांच्या काळात चार्ल्सचा एका खानदानी घराण्यात जन्म झाला. बरं त्याचं खानदान हे जुनं ब्रिटीश घराणं. म्हणजे पोकळ रुबाब मिरवणारे नमुनेदार घर. वडील डॉक्टर आणि जमीनदार. चार्ल्सला रुबाब दाखवणे सोडाच, अभ्यास करणेही जमेना. शाळा कशीबशी पूर्ण करून, वडिलांच्या दबावाखाली त्याने वैद्यकीय शाळेत प्रवेश घेतला. वडिलांच्या हट्टापायी त्याने मेडिकलला एक वर्ष कसं बसं काढलं. अभ्यास कधीच केला नाही. परिणामी, वडिलांना विद्यापीठाकडून पत्र आले, कि तुमच्या मुलाचे शिक्षण तहकूब करण्यात येत आहे. वैतागून नंतर चार्ल्सच्या वडीलांनी त्याला धर्मगुरु करायचं ठरवलं. एका विद्यापीठत प्रवेश ही मिळवून दिला. तिथे त्याला बायबल आधारीत गोष्ट शिकवत - ईश्वराने एका आठवड्यात जग कसे निर्माण केले. जेनेसिस वगैरे गोष्टी. त्या गोष्टीमध्ये रस नसण्यापेक्षा जास्त त्या घरातल्या दबावाखाली तो त्यात रमला नसावा असे मला वाटते. विद्यापीठातच त्याला हेन्स्लॉ नावाच्या एका वनस्पतीशास्त्रज्ञ मित्राचा नाद लागला. त्याच्या बरोबर पानं, फुलं, काटे, कुटे गोळा करत रहायचा त्याला छंदच लागला.
किशोर वयात म्हणजे जेमतेम बाविशीत, चार्ल्स ने बीगल नावाच्या इंग्लंड्च्या राणी सरकारच्या बोटीवर सफरीला जायचे ठरवले, त्या बोटीचा कप्तान फिट्झगेराल्ड हा चार्ल्सचा मित्र होता. सफरीचा उद्देश होता की नवीन बेटे शोधणे, नकाशे बनवणे, तिथली माहिती गोळा करणे वगैरे. तेव्हा बोटीवर एका 'नॅचरलीस्ट' (हा बहुदा त्याकाळचा शब्द असावा) ची आवश्यकता होती. चार्ल्सने घरी सांगितलं. साहजिकच घरून जोरदार विरोध झाला पण चार्ल्सच्या सेजविक मामानी लिहिलेल्या शिफारशीच्या पत्रामुळे त्याचे वडील चार्ल्सला सोडायला तयार झाले. बीगलचा प्रवास ठरला होता २ वर्षांचा पण साधारण ५ वर्षे चालला. त्या काळात ती बोट (म्हणजे शिडाचं गलबत) दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया, आणि ऑस्ट्रेलिया इतका मोठा पल्ला गेली. बघा एवढा मोठ्या श्रीमंत घरातला हा मुलगा कुठल्याही त्रासाची पर्वा न करता असला खडतर प्रवास करता झाला. किती त्रास झाला असेल त्याला - बोट तर पहिल्याच दिवशी पासून लागली, जेवण पण जात नव्ह्तं. नाहीतर आपण! पुणे- मुंबई जायचंय, मग आपली स्वतःची कार असलेली बरी, असं म्हणतो. ती बोट जिथे जिथे थांबत असे, तिथे उतरून चार्ल्स तिकडच्या निसर्गाचा अभ्यास करत असे. सगळीकडे पायी हिंडत असे. आणि असं १५-२० मिनिटांचं चालणं नाही, तर चांगले दोन्-अडिचशे किलोमीटर; ते सुद्धा झाडाझुडपातून!
त्याने तिकडे खूप चित्र, विचित्र प्राणी, पक्षी, वनस्पती पाहिल्या. त्याने त्याच्या विद्यापीठातल्या लायेल मास्तरांचं जिओलॉजीचे पुस्तक बरोबर नेलं होतं. ते पुस्तक तो सतत वाचायचा. मग समुद्र, भूकंप, वेगळ्या झालेल्या जमिनी, तयार झालेले डोंगर सगळंच त्याने खूपच जास्त कुतुहलापोटी पाहिलं. एकदा तर त्याला अख्खा मोठमोठ्या सापळ्यांनी भरलेला डोंगरच्या डोंगरच सापडला. मग त्याला फॉसिल्स म्हणजे जीवाश्माचा शोध लागला. मग त्याला एखाद्या प्राण्याचा सापळा दिसला की त्याची विचारचक्र सुरु व्हायची. हा प्राणी आत्ता इथे दिसत आहे मग तो आफ्रिकेतसुद्धा पाहिला होता, पण ऑस्ट्रेलियामध्ये का नाही दिसला? जे काही तो पहायचा त्यातले काही नमुने तर तो घरीसुद्धा आवर्जून पाठवायचा. अशी त्याने हजारो पत्र ५ वर्षात पाठवली. मग त्याने वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि त्यांच्या सवयी पाहिल्या. एके ठिकाणी कासव दिसले, ते मान बाहेर ऊंचावून पाला खात होते, तर दुसर्या जातीचे कासव अगदी आखूड मानेचे होते. कारण त्यांना मान उंचावून खायची कधी वेळच आली नव्हती कारण त्यांच्या परिसरात जमिनीलगतची झाडं भरपूर होती. शिवाय त्यांची पाठ वेगळी, त्याच्यावरचं नक्षिकाम वेगळं. जिराफ या प्राण्याचे मानेचे सुद्ध असेच. आजूबाजूला जसं अन्न असेल त्याप्रमाणे पक्ष्यांच्या चोची बनल्या. हवेत भरारी मारण्यासाठी तर किती तरी बदल झाले आहेत हे त्याच्या हळूहळू लक्षात येवू लागले. एकदा डार्विनला एक खूप मोठं सूरनळीसारखे फूल दिसले, तेव्हा तो म्हणाला की - एवढी खोल जीभ असणारा कीटक सुद्धा नक्की असणार. नंतर कधीतरी पन्नासेक वर्षांनी तश्या किटकाचा शोध सुद्धा लागला.
प्राणीच कशाला बघताय? आपण माणसे सुद्धा अशीच. ठरविक अवयव वापरल्यामुळे तेवढेच अवयव गरजेप्रमाणे बदलत गेले; जसे की अंगठ्याचा वापर केल्याने हाताची पकड बदलली. माणूस दोन पायांवर चालू लागला, मग स्वरयंत्र खाली सरकलं आणि आवाज बदलला, भाषा तयार झाली, मग विचार करण्याची क्षमता वाढली आणि मेंदुचा आकारही वाढला वगैरे वगैरे. अजून एक उदाहरण म्हणजे आक्रिकेत सुर्य जास्त, मग तिथे लोकांची त्वचा काळी असते आणि त्यामुळेच बर्फात राहणारे एस्कीमो तर लाल रंगाचे असतात. जिथे सुर्य जास्त तिथे व्हिटॅमिन डी तयार व्हायला आणि त्वचेच्या रंग काळे करून शरीराला सांभाळणारे मेलॅनिन जास्तच बनणार ना.
इंग्लंड्ची औद्योगीक क्रांती व्हायच्या आधी काळी फुलपाखरं संख्येनी कमी असायची, कारण ती त्यांच्या शत्रुंना पट्कन दिसायची. मग क्रांती घडल्यावर कोळश्याच्या धुरामुळे सगळं वातावरण हळूहळू काळवंडलं, आणि मग काळ्या फुलपाखरांना लपायला चांगल्या जागा मिळाल्या, आणि पांढर्यांची संख्या रोडावू लागली. असंच काळ्या पांढर्या उंदराबद्दल सुद्धा आहे की.
मला खरंच कळत नाही, एखाद्या गोष्टिच्या हात धुवून मागे लागण्याचं हे वेड कुठून येतं हो? हा ध्यास कुठून येत असेल? एक ना अनेक - किती उदाहरणं देऊ? माझ्या मते आपल्याला गवताच्या पानाएवढं माहिती आहे आणि अथांग आकाशाएवढं माहीत नाही या भावनेचा एक प्रकारचा नम्रपणा अश्या डार्विन सारख्या चिकित्सक आणि शास्त्रज्ञ लोकांत असतो. सारे जीवनच ते या ध्यासापायी वेचतात, पण बहुतेकांना हाती शेवटपर्यंत काहीच लागत नाही.
पहिला जीव कसा तयार झाला हा डार्विनचा विषय नाही, त्याच्यापुढे त्या जीवाची उत्क्रांती कशी झाली हा त्याचा विषय आहे.
एका पेशीच्या पासून आणि पाण्यात पहिला जीव तयार झाला, पण मग विभाजन होताना, चुका घडल्या, त्यामुळे वेगवेगळ्या जीवांची निर्मिती झाली. मग एक सिंपल वनस्पती बनली, तिनीच तर सगळ्यांना खूप प्राणवायु देवून सांभाळलं! मग तिला पानं तयार झाली, मग नेचे आल्या, मग प्रजोत्पादनाच्या सवयी बदलल्या, फूलं आली, कीटकांना आकर्षित करण्यासाठी रंग आले. प्राण्यांमधली उत्क्रान्ती मात्र टप्प्याटप्प्यानी. आधी एकपेशीय - मग मध्ये जेली आले, कासवे, मासे, शिम्पले, सुसरी, मगरी, विंचू, खेकडा मग सस्तन वर्गातला देवमासा. मग त्यांच्या सवयी बदलल्या तसे बदल घडू लागले.
डार्विनचे वाक्य आहे, " एखादी जात बुद्धीने तल्लख आहे किंवा शरिराने बळकट असेल म्हणून ती नक्की टिकणार असं नाही, तर ज्या जातीमध्ये परिस्थितीशी 'अडॉप्ट' करून घ्यायची सवय जास्त ती जमात नक्की जास्त टिकणार. हिरोशीमा, नागासाकी अणुबाँब हल्ल्यानंतर काही कीटक तग धरुन टिकले. झुरळे, मगरी, पाली या तर आपल्या खापर-खापर पणज्या आहेत इतक्या जुन्या काळापासून आहेत. ते परिस्थितीप्रमाणे बदलून घेतात म्हणूनच संपत नाहीत कधी! आपण काहीतरी चांगलं घेऊयात त्यांच्याकडून. जेव्हा कधी नैसर्गीक संकट येईल तेव्हा हातपाय गाळून न टाकता कामाला लागण्यासाठी लक्षात ठेवूया.
असंख्य नमुने, असंख्य प्रश्न, अनेक तर्क वितर्क यांच्या गोतावळ्यात असताना डार्विननी एके दिवशी वॉलेस नावाच्या त्याच्या समविचारी ज्युनियरनी पाठवलेला निबंध वाचला. त्याला धक्काच बसला कारण या वॉलेसने सुद्धा डार्विनचेच निष्कर्ष स्वतःच्या निबंधात मांडले होते. वॉलेसने निबंधाबरोबर डार्विनला अशी विनंती केली हा निबंध पुढे लायेल मास्तर वगैरे बुजुर्ग लोकांना पाठवावा. डार्विनचे मोठेपण हे की त्याने तो निबंध जड मनाने तसा पाठवला देखील, पण सगळ्यांनाच माहीत होतं की डार्विन खूप वर्ष या विषयावर संशोधन करीत आहे. मग असं ठरलं की दोघांनीही एकाच वेळी आपले आपले निबंध लिनियन सोसायटी पुढे वाचून दाखवावेत आणि तसं केलंही गेलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या वेळेस त्याच्या मुलाच्या निधनामुळे खुद्द डार्विन उपस्थित राहू शकला नाही. बघा किती दैवदुर्विलास.
येथे वॉलेस ला सुद्धा विसरून जाता येणार नाही. त्याला डार्विनबद्दल कुठेही असूया नव्हती. त्याने तर 'डार्विनिझम' असा ग्रन्थ देखील लिहिला. बघा. थोर मोठ्या माणसांची चरित्रे वाचली की हे कायम लक्षात येते की त्यांच्या क्षेत्रात कितीही मोठे झाले तरी त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात ते खूप समंजस, सरळ, निष्कपट, उदार स्वभावाचे असतात. त्यातलेच हे वॉलेस आणि डार्विन. पुढे वॉलेस च्या प्रत्येक गोष्टीमध्ये डार्विन आधारस्तंभ बनून राहिला. जे खूप क्षूद्र असून महान असल्या सारखे राह्तात अश्या कितीतरी लोकांवर मला हसू का रडू असं होतं.
डार्विनने २०० वर्षांपूर्वी हा विचार केला होता. साहजिकच त्या काळचा कर्मठ समाज डार्विनचं सहजासहजी ऐकून घेण्यासारखा नव्ह्ता. कदाचीत म्हणूनच त्याने पुस्तक लिहायला उशीर लावला असेल. डार्विनची पुस्तकातील भाषा ही अतिशय जबाबदारपूर्ण, संयमी आहे. त्याचे विचार त्याच्याच म्हणण्याप्रमाणे 'अॅग्नोस्टिक' आहेत, म्हणजे देव नाही असं म्हणण्यापेक्षा, 'माहित नाही असू शकेल' असे आहेत. निबंध वाचल्यानंतर एका वर्षाने त्याने स्वतःचा ग्रंथ प्रकाशीत केला. गम्मत म्हणजे खुद्द डार्विन हा ग्रंथाच्या रचनेवर, नावावर समाधानी नव्ह्ता. त्याला अजून चांगले द्यायचे होते. डार्विनच्या ग्रंथाचे नाव 'ओरिजीन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन' असं लांबसडक असले तरी ओरीजीन ऑफ स्पीशीज अश्याच नावाने ते ओळखले जाते. पहिल्याच दिवशी या पुस्तकाच्या १२५० प्रती खपल्या गेल्या. आता ते एक क्लासिक आणि जीवशास्त्रज्ञांचं बायबल म्हणून प्रसिद्ध आहे. जीवशास्त्रामध्ये सगळयात महत्वाचे म्हणजे 'की-स्टोन' असे त्याचे वर्णनही कुणीतरी केले आहे.
डार्विनबद्दल एका अमेरिकन मासिकाने लिहिलंय की, 'आजवर जगाला वळण देणारे न्युटन, आइन्स्टाइन सारखे खूप शास्त्रज्ञ झाले. कालानुक्रमे त्यांचे काही विचार बदलावे लागले, काही शाबूत राहिले, पण डार्विन असा शास्त्रज्ञ आहे की ज्याच्या थीअरीज कालानुक्रमे अधिकच भक्कम होत गेल्या.' म्हणून हा श्रेष्ठ! कोण कुठल्या शास्त्राचं शिक्षण नसलेला हा माणूस. काय आयुष्य जगलं त्यानं! त्याचंच एक वाकय आहे, तो म्हणतो 'एखाद्यानी त्याच्या आयुष्यातला एक तास वाया घालवला, तर त्या माणसाला आयुष्याची किंमत कळली नाही.'
'ओरिजीन ऑफ स्पीशीज' च्या प्रकाशनापुर्वी पंधरा - सोळा वर्षे आधी त्याने एक आराखडा करून तो एका बंद पाकिटात चारशे पौंड घालून बंद करून ठेवला आणि त्या सोबत बायकोला पत्र लिहिले की, माझं काही बरंवाईट झालं तर हे लिखाण प्रकाशित कर. हा झाला चांगुलपणा. बायकोला काळजी नको. डार्विनने ७४ व्या वर्षी प्राण सोडले. त्याचे थडगे वेस्ट मिनिस्टर अॅबी येथे असावे असा आदेश डार्विनच्या कामगिरीचा बहुमान करण्यासाठी इंग्लंड्च्या राणीने दिला.
माणसाच्या उत्क्रांतीविषयी डार्विन म्हणतो, जर मनुष्याने त्याच्या इंद्रियांवर आणि विचारांवर नियंत्रण ठेवले तर मनुष्य जमातीची उत्क्रांती आणि प्रगती होइल. अरेच्चा, आपल्या भगवद्गीतेमध्ये, आपल्या सगळ्या संतांनी हेच सांगीतले आहे की!
Comments
हॅट्स ऑफ :)
तू खरंच शास्त्रज्ञ आहेस.
great arjun.......