Skip to main content

खिलाडूव्रुत्तीचे कांगारू

शिर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? पडला असाल तरच वाचा, नसाल तर नका वाचू कारण पुढे ऑस्ट्रेलियन खिलाडू व्रुत्तीचे वाभाडे काढायचा माझा मानस आहे. 

यान चापेल हा जुना ऑस्ट्रेलियन कर्णधार. १९७३ -७४  दरम्यान त्याच्या संघाने न्यूझीलंड दौरा केला  होता.  हा दौरा त्याच्या संघाच्या उर्मट वागण्याने इतका वाजला होता की, काही किवी पत्रकारांनी त्यांना  ’अग्ली ऑस्ट्रेलियन्स’ असे  म्हंटले होते. त्यावर १९७६ मध्ये (हो; या जाहिर उर्मटपणाची सुरुवात तेव्हापासून चालू आहे) त्याने एक लेख लिहिला. त्यात तो म्हणाला,

"खरंतर आम्हाला सज्जन संघ म्हणूनच ऒळखले जावे हीच सगळ्यांची इच्छा  असते. मैदानामध्ये उतरताना आमचा संघ कधीच मुद्दामहून ’भडव्यांचे टोळके’(Bunch of bastards) म्हणून ओळखला जावा असं कुणालाच वाटत नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार या नात्याने माझं तत्वज्ञान  एकच. मैदानावर ११ ते ६ या वेळात सज्जन राहायला वेळच नसतो. मैदानावरचे खेळाडू आपला खेळ जास्तीत जास्त कठोरपणे आणि चांगला कसा होईल यावर लक्ष देऊन आणि तसंच जमले तर थोडेफ़ार नियम सांभाळून खेळतील अशी अपेक्षा असते. आता यात सज्जन राहायला वेळच मिळत नाही."   क्रिकेट मध्ये तरी या बाबतीत असं पहिल्यांदाच बोललं गेलं असेल.

इयानचा भाऊ ग्रेग चापेल (भारताचा गांगुली कर्णधार असतानाचा गुरु) याने १९८१ मध्ये न्युझीलंड विरुद्ध टाकलेला ’अंडरआर्म’ चेंडू तर प्रसिद्ध आहे. झालं काय की त्या कसोटी सामन्यात न्युझीलंडला जिंकायला हवे होते २३५. चांगले खेळले किवी. सामन्यातील शेवटची ओव्हर शिल्लक होती आणि न्युझीलंडला हवे होते १५ रन. गोलंदाज होता ग्रेगचा  भाऊ ट्रेव्हर चापेल. त्याने चांगली गोलंदाजी केली अन पहिल्या पाच चेंडूत २ गडी बाद करून ९ रन दिले. शेवटच्या चेंडूवर ६ धावा अशी स्थिती होती, त्यावेळेस ग्रेगने फ़लंदाज, अंपायर यांना गोलंदाज शैली बदलत आहे अशी सूचना केली, आणि ट्रेव्हरला सरपटी चेंडू टाकायची सूचना केली. ऑस्ट्रेलियन विकेट्कीपर रॊड मार्श आपल्या कप्तानाच्या अश्या भ्याड वुत्तीच्या विरोधात असतानाही, ट्रेव्हरने चेंडू सरपटी टाकला. न्युझीलंडच्या फ़लंदाजाने तो चेंडू फ़क्त  अडवला. त्याक्षणी जवळपास पन्नासेक हजार लोकांनी स्वत:च्याच संघाच्या अश्या अखिलाडू व्रुत्तीवर मोठ्याने आरडाओरडा करून निषेध व्यक्त केला. आज चाळीस वर्षांनी ही जखम ग्रेगला खाते हे तो मान्य मात्र करतो.       

लांबलचक शरीर अन छोटे हात अशी दैवी देणगी लाभलेला जलतरणपटू इयन थोर्प. २००० सिडनी आणि २००४ अथेन्स ओलिम्पिक मध्ये खूप पदकं मिळवणारा एकमेव जलतरणपटू ठरला. परंतु तिथूनच त्याचे बिघडणे सुरु झाले, २००४  ला दोन वेळा तो तोल  गेल्याने  फॉल्स  स्टार्ट म्हणून डिसक्वालिफ़ाय झाला. पुढे जागतिक जलतरण संस्थेने त्याचा नेहमीचा स्विम सूट त्याचा परफ़ोरमन्स वाढवायला मदत करतो म्हणून बदलायला सांगितला. परंतु त्यानी त्याला नकार दिला. २००६-०७ मध्ये त्याने निव्रुत्तिपश्चात वर्षभराने पुनर्पदार्पणाचा निर्णय घेतला. त्यावर्षीच तो उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आणि त्याने पुन्हा निव्रुत्तीचा निर्णय घॆतला. त्यावेळेस तो म्हणाला, "देशवासियांनो मला माफ़ करा, मी तुमच्या अपेक्षा पेलू शकलो नाही!" (जेमतेम २ दोन कोटी लोकसंख्येच्या अपेक्षा बिचार्याला जड झाल्या, आपला सचिन कधीही देवबाप्पाच. २ कोटी मुंबैतच असतील, येउन जाऊन. असो. )

रग्बी, हॊकी, फ़ूटबॊल इतकंच काय फ़ोर्म्युला वन मध्येही  ऑस्ट्रेलियन संघानी असा केवळ जिंकण्यासाठी म्हणून आटापिटा केला आहे, त्यांच्या नोंदी मी देवू शकतो परंतु तूर्तास क्रिकेटबद्दलच बोलू.       

ऑस्ट्रेलियन्स हे पूर्वीचे ब्रिटिशांचे कैदी, मुळचे ब्रिटिशच. ब्रिटिशांनी या निर्जन बेटावर यांना फ़ार पुर्वी आणून टाकलं. अजूनही, इंग्लिश प्रेक्षक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मनगटावर मनगट हे  इंग्रजी एक्स आकारात ठेवून, जणु काही बेड्या ठोकल्या आहेत, आणि तुम्ही आमचे कैदी आहात  अश्या हावभावाने अजुनही डिवचतात. इंग्लड्ने १९३० साली ’बॉडीलाईन’- म्हणजे सगळे क्षेत्ररक्षक लेग साईडला  लावून फ़लंदाजाच्या अंगावर, डोक्यावर बाउंसर टाकणे असा प्रकार सुरु केला. सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची फ़लंदाजी ही अशी कौशल्यपूर्ण होती! केवळ त्याना बाद करता येत नाही म्हणून असा प्रकार इंग्लंड्ला सुरु करावा लागला. कदाचित हे असले डिवचणे तेव्हापासून त्यांच्या पेशी पेशींत हळूहळू भिनत गेले असावे, अन त्याचा आता स्फ़ोट होत असावा.

नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धापासून आत्ताच्या गेल्या दहा वर्षात त्यांचा उत्तानपणा कले-कलेनी वाढतच आहे. २००० च्या दरम्यान ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज ग्लेन मक्ग्रा विंडिजच्या ब्रायन लारा जवळ थुंकला होता. त्याच दरम्यान मक्ग्रानेच विंडिजच्या सरवानशीही बाचाबाची केली. (फ़रक एवढाच होता की यात ’बा’ चा नसून एकमेकांच्या’बा’यकांचा उद्धार केला होता). मक्ग्राने सचिनशी पण उद्धटपणाने वागल्याचे म्हणजे सलग ४ बाउन्सर टाकून ’हूक मार,  पुल कर’ असे हातवारे केल्याचेही स्मरणात आहे. स्लेजिंगचे महत्व काय हे हळूहळू ऑस्ट्रेलियानेच देशाला पटवून दिले असे म्हण्टले तर वावगे ठरणार नाही.   

त्यानंतर ज्याचं आवर्जून नाव घ्यावं असा  खेळाडू म्हणजे रिकी पोंटिंग. आज जिथे जिथे आपला सचिनबाप्पा उभा आहे, प्रत्येक ठिकाणी त्याच्या मागे मागे रिकी पोंटिंग दिसतोच. कधी कधी प्रश्न पडतो, हा माणूस या स्थानावर येण्यास खरंच लायक आहे का? उत्तर मिळतं सचिनशी तुलना होतेय एवढी योग्यता नाही, पण एक फ़लंदाज म्हणून तो तेवढाच ग्रेटही आहे. एका कर्णधाराच्या बाबतीत किती वाद्ग्रस्त घटना घडाव्यात, याचं हे उदाहरण. मार्क टेलर आणि स्टीव्ह वॊ यांच्या प्रचंड बलाढ्य अश्या संघाची धुरा त्याने सांभाळली. तो जिंकत गेला पण मक्ग्रा, वॊर्न, गिल्ख्रिस्ट, हेडन यांच्या नंतर (सायंड्स सोडून) एकही खेळाडूला त्यानी वर आणले नाही. असो, वैयक्तिक टीका आवरती घेतो.

१९९९ दरम्यान वॊ कप्तान असताना, रिकी हरभजन करवी यष्टिचीत झाला, त्यावेळेस हरभजनने त्याला बोट दाखवल्याने त्यांची शाब्दिक चकमक झाली होती अन दोघानाही दंड झाला होता. इथून जे सुरु झालं त्यानंतर २००१ अशेस मालिकेत डॆरेन गॊफ़ च्या गोलंदाजीवर बाद दिलेले असतानाही त्याने परत जायला नकार देणे अन त्यानंतर १४४ धावा बनवणे  प्रकार घडला. पुढे अगदी २००६-०७ पर्यंत (२००५ अशेस वगळता) ऑस्ट्रेलियाची घोड्दौड द्रुष्ट लागण्यासारखी चालली होती. २००६ ला त्याच्या टीम ने शरद पवारांकडून चषक हिसकावून घेणे वगैरे प्रकार  तरीही  घडलाच. २००७ च्या  भारताच्या  ऑस्ट्रेलिया दौर्यातील रोमहर्षक सिडनी कसोटीनंतर अनिल कुंबळेचे वक्तव्य होते की, "एकच संघ खऱ्या स्पिरिट मध्ये क्रिकेट खेळला”. यावर पत्रकार परिषदे मध्ये पॊंटींगने पुन्हा भारतीय पत्रकारांपुढे गोंधळ घातला, अन भारतीय खेळाडूंवर आरोप केले. तेव्हा हरभजनचाही रेसिझमचा नवीनच किस्सा झाला होता. मला आठवतंय त्याच्या वर्षभर आधी डॆरेन लेहमन या  ऑस्ट्रेलियन  खेळाडूवर रेसिझमच्याच  आरोपावरून ७-८ सामन्यांची बंदी आली होती, त्याचाच तर हा परिणाम नसेल? त्याच कसोटीमध्ये  गांगुलीचा झेल घेतल्यानंतर अंपायरने नाबाद दिल्यानी, पॊंटीगने बोट दाखवून जायला सांगितले आणि अंपायरशी वाद घातला होता. कुंबळेनी नंतर हिन्दुस्तान टाइम्सच्या मथळ्यात लिहिलं की, ’पॊंटिंग त्यावेळी ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हता, खरतर अश्या  गोष्टी  मैदानावरच ठेवलेल्या चांगल्या. मैदानात आणि मैदानाच्या बाहेर अश्या गोष्टी वैयक्तित्क तिढे वाढवतात. ’ पीटर रोबुक या ब्रिटिश पत्रकारानेही त्या वेळी पॊंटिंगला ’अरोगंट’ असे संबोधले, शिवाय त्याचे कर्णधारपद हिसकावले जावे असेही लिहिले. परवाही असाच किस्सा घडला, कामरान अकमलने रिकिचा झेल टीपला, तरी हा तिथून जायला तयार नव्हता, त्याच्या उलट सचिन दुसर्या दिवशी अगदी हलकी कड असतानाही चालता झाला. स्टीव स्मिथ बरोबर परवा झेल घेताना टक्कर झाली मग चेंडूच फ़ेक, किंवा रन आउट झाल्यावर टीव्हीच फ़ोड, किंवा पंचांशी हुज्जत घालण्यात वेळच दवड. दर २ महिन्यांने याच्यावर माफ़ी मागायची वेळ येतेच.

फ़ार जुनी गोष्ट नाहिये, दोन महिन्यापूर्वी झालेल्या ऎशेस मालिकेमध्ये इंग्लंड्चा पूर्व कप्तान तसेच धडाडीचा महान खेळाडू इयन बोथम याने फ़िल ह्युज या ऑस्ट्रेलियन खेळाडूवर खमंग फोडणी मारली.  झालंही असंच होत, फील ने अलीस्टर कूक चा टप्पा पडलेला झेल घेतला होता. इतर खेळाडूं मध्ये ही स्टीव्ह वॊ, शेन वॊर्न, हेडन हेही काही कमी नव्हते, पुन्हा सांगीन त्यांचे किस्से कधीतरी. कांगारुचं हे असंच आहे, एक गिलख्रिस्ट अन दुसरा ब्रेट ली सोडला तर खिलाडूव्रुत्ती दिसतच नाही कुठे.

फील ह्यूज असो की रिकी पंटर की अजून कुठल्या खेळातला अजून कुणी  ऑस्ट्रेलियन, ऑस्ट्रेलियाच्या विविध खेळांच्या संघामध्ये केवळ जिंकण्यासाठी काहिही करू असा विचार करण्याचा रोग जडला आहे. जिंकण्यासाठी हे लोक वेडेपिसे होऊ शकतात. ’ऒब्सेशन अबाउट विनिंग’ म्हणतात ना ते यांच्याकडे पाहून शिकावं. खरंतर त्यांच्या संस्क्रुतीमध्येच हे भिनले आहे. परंतु हे अश्या त्यांच्या व्रुत्तीने ते खेळत आहेत म्हणूनच त्यांच्या सेनेचे खूर चौफ़ेर उधळलं, भरपूर यश मिळवलं हेही खर.  पण त्याबरोबरच अश्या खेळामुळेच अफ़्रिकेने ४३५ करून त्यांचा केलेला पाडाव, भारतानी ऎड्लेड कसोटीमध्ये त्यांच्यावर केलेली मात, कलकत्ता कसोटी मध्ये लक्ष्मणने जिंकलेली कसोटी, २००५, २००७ साली इंग्लंड करून झालेला पराभव अशी केवळ ’न भुतो न भविष्यति’ अपयशे सुद्धा पचवली आहेत.

भारतीय संघासमोर विश्वचषकाच्या वाटेवर आता हेच ऑस्ट्रेलिया नावाचे विघ्न  उभे  राहिले  आहे.  धोनी, युवराज, युसुफ़, सचिन, जहीर यांच्या भारतीय संघाची वाटचाल कायम राहून भारतीयांचा विश्वचषकाचा चढू लागलेला ज्वर असाच कायम राहो ही आत्ता निरोप घेतानाची सदिच्छा!                      

Comments

ऑस्ट्रेलियन्स हे पूर्वीचे ब्रिटिशांचे कैदी.... पटतंय पंत .....Adam Gilchrist सोडला तर एक धड नाही, आता तर तोही नाही...
हेरंब said…
उत्तम साहित्य, पंत.. आवडलं. एकूण एक मुद्द्याशी सहमत. त्या पॉंटिंगचं थोबाड जरी बघितलं तरी चीडचीड होते माझी !!
Unknown said…
त्यांच्या सारखे आपण कधी वागू ? जमाना साधूचा नाही आहे... मित्रा :)
पेशवे said…
पंत, असले वागणे ऑस्ट्रेलिअन लोकांच्या रक्तामधेच आहे. कोणी सुद्धा ते बदलू शकणार नाही.
Unknown said…
खरंच आहे धनुडे!

आता तो फक्त आयपीएल मध्ये, पण त्यांनीही आपल्या सचिनच्या इनटीग्रीटी वर टीका केलीच निवृत्ती पश्चात. शेवटी दुतोंडी ते दुतोंडीच.
Unknown said…
हेरंब -

धन्यु, लोभ असावा!

उद्याला त्याची हरलेली टीम पाहिली म्हणजे १९९९ पासून ची तमन्ना पूर्ण होईल.
Unknown said…
राजे - नाही पटलं. त्यांच्या सारखे खेळा. उर्मटपणा नको.

जेवढी त्यांच्या वागण्यावर चीड आहे ना, तेवढाच सचिन, द्रविड, कुंबळे यांच्या सभ्यतेबद्दल अभिमान आहे.
Unknown said…
पेशवे -

मान्य करतो, म्हणून त्याना हरलेले बघताना खूप आनंद मिळतो.
अभिषेक said…
फारच छान लिहिलंय तुम्ही पंत! ब्लॉग एकदम सुरेख!
Unknown said…
अभिषेक वेलकम आणि आभार! :)

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च