वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या, पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना?
असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या गाडीच्या इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणार आहे, तरी कृपा करून ते विनोदी समजून वाचू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. :)
इंजिन समजून सांगावयास अजून सोपे करण्यासाठी उदाहरण म्हणून आपण अतिशय सोप आणि
मुलभूत असे बुलेट (बोली भाषेत फटफटी ) चे इंजिन बघुया. हे एवढे मुलभूत आहे की म्हणजे 'अंग्रेजोंके जमानेसे' यात विशेष असा बदल नाही झालाय...अगदीच सातवीचे भौतिकशास्त्र हो! दुसरी गोष्ट म्हणजे सुरु होण्यास ती गाडी अवघड. तर चला मुळात शिरलोय, आता खोलात शिरू!
एका किक मध्ये बुलेटचे इंजिन एकदाच फिरते, इतर दुचाक्यांची इंजिन 'काही वेळा' फिरतात. याचा अर्थ बुलेट इंजिनाला एका किक् मध्ये स्पार्क-प्लग मधून एकच ठिणगी मिळते. म्हणजे किक मारताना , जर बरोबर 'ठिणगी' नसेल, आणि बरोबर इंधनाचा दाब नसेल; बरोब्बर दबाव नसेल ..... तर हरी हरी होते आणि आपण पुन्हा प्रयत्न करतो. इतर गाड्यांच्या बाबतीत तसे नसते कारण ठिणगी आणि इंधन यांचा ताळमेळ साधण्यासाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त संध्या असतात.
याचं कारण काय बरं असेल? तर बुलेट इंजिन हे कुठल्याही 2-स्ट्रोक इंजिनच्या तिप्पट असतं. ढोबळ प्रमाणानुसार सांगायचे तर, बुलेट सुरु करण्यासाठी 2-स्ट्रोक इंजिनाच्या तीन पट प्रयत्न करावे लागतात म्हणून. (2 स्ट्रोक इंजिने ही स्कूटर, जुन्या यामाहा, रिक्षा यांसारख्या गाड्यात असतात.)
काही लोक म्हणतात, "यड्या, आपली गाडी अर्ध्या किक मध्ये सुरु व्हते". तुम्ही किक मारण्यास सुरुवात करता म्हणजे तुम्ही खरतर इंजिन मधील 'पिस्टन' ची जागा स्थिर करीत असता. बुलेट सुरु करताना, जिथे ठिणगी होणार आहे, त्याच्या जरा आधी किक सुरु केली, म्हणजे तुम्हाला 'पॉवर स्ट्रोक' आणि 'Exhaust' स्ट्रोक मिळेल आणि शिवाय 'इनटेक स्ट्रोक' (पिस्टन आणि फ्लायव्हील याना गतिमानता) मिळेल आणि इंजिनाला टोप डेड सेंटर चे चक्र पूर्ण करण्यास पुरेशी गतिमानता मिळेल. तुमच्या इंजिनामध्ये जरा आधीपासून दाब खूप कमी असेल, तर अर्ध्या काय पाव किक नी सुद्धा तुमची गाडी सुरु होईल. (हा दुवा पाहून हे सगळे तुम्ही कल्पना करू शकता)
हे समजले तर बुलेटच्या कुप्रसिद्ध BACK KICK कडे वळूया. आता कुठलाही पक्या फिटर पण सांगेल की हे 'Advance' मुळे होते. पण अक्सीलरेटर कमी-जास्त पिरगाळणे किंवा किक चे मुलभूत टाईमिंगच चुकीचे असणे अश्या शंका याच्या पाठी असू शकतात. मग सायलेन्सर नीळा पडणे, स्प्रे पेंटिंग सारखे पेट्रोल बाहेर येणे असे प्रकार होऊ शकतात. याचं परीक्षण करता येईल.
सुरुवातीला किक हि फ्लाय्व्हील आणि पिस्टन साठी गतिमानता साठवते (आठवा- स्थितीज उर्जेचे गतीज उर्जेत रुपांतर), त्या ताकदीचा काही भाग हा 'COMPRESSION ' साठी वापरला जातो (compression stroke), जो पिस्टनला त्याच्या प्रमाणानुसार हळू करतो. त्यामुळे जर 'अक्सीलरेटर' पिरगाळला असेल तर त्यामुळे इंजिन मध्ये जास्त हवा आत येते आणि पिस्टन जास्त हळू होतो आणि टोप डेड सेंटर चे चक्र पूर्ण होण्यापूर्वीच, तिथे ठिणगी उडते आणि बदलामुळे चक्र उलटेच फिरायला लागते - 'BACK - KICK'! मग तुम्ही अजून जोरात किक मारू शकता किंवा अश्या प्रकारे बरोब्बर टायमिंग नी किक मारू शकता.
ठीक. टायमिंग कमी जास्त करून किक मारली, पण तुम्हाला असं दिसलं की सायलेन्सर निळा पडू लागला आहे (असं फार कमी होतं म्हणा) याचा अर्थ कार्ब्यूरेटर चे सेटिंग चुकलं आहे. म्हणजे इंधन नीट जळत नाहीये. अजून सोप्या भाषेत सांगायचे तर इंधन जळण्याची क्रिया सुरु असताना ते पूर्ण न जळता 'EXHAUST' मध्ये पोहोचत आहे. इंधना मधील भेसळ सुद्धा याला कारणीभूत होऊ शकते. तुम्हाला एकदा नक्की कळलं कि काय होतंय, त्यावरून तुम्ही ठरवू शकता की दुर्लक्ष करायचे कि दुरुस्त किंवा फिटर कडे घेऊन जायचं.
पेट्रोल मधला फरक असो किंवा कार्ब्यूरेटर चे सेटिंग, ठिणगीचे टायमिंग आणि इंजिनातील दाब यांच्या मधला फरकाचा प्रभाव हा प्रत्येक इंजिनावर असतोच, पण बुलेट मध्ये जास्त अनुभवला जातो. याच मुळे बुलेट सुरु करण्यापूर्वी प्रत्येक बुलेट नुसार सुरुवातीच्या पद्धती लागू होतात. 'चोक' देणे किंवा न देणे हि सुद्धा त्यातलीच एक. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी।
.
Comments